धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 04:20 AM2024-05-03T04:20:47+5:302024-05-03T04:21:17+5:30
शहापूर तालुक्यातील चांदिवली परिसरात राहणारे दत्ता भोईर आणि प्रदीप शिरोसे हे त्यांच्या दोन मित्रांसोबत उल्हासनगरला हळदी कार्यक्रमात आले हाेते.
कल्याण : धावत्या लोकलमध्ये प्रवाशांच्या दोन गटांत झालेली हाणामारी आणि त्यातून झालेल्या सशस्त्र हल्ल्यात दत्ता भाेईर (वय ५५) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिसांनी चार हल्लेखोरांपैकी अमोल परदेशी आणि तनुज जुमवाल यांना अटक केली. दोघांचा शोध सुरू आहे.
शहापूर तालुक्यातील चांदिवली परिसरात राहणारे दत्ता भोईर आणि प्रदीप शिरोसे हे त्यांच्या दोन मित्रांसोबत उल्हासनगरला हळदी कार्यक्रमात आले हाेते. कार्यक्रम आटोपून चौघांनी घरी परतण्यासाठी शहाड रेल्वे स्थानकातून कसारा लोकल पकडली. दत्ता भोईर आणि प्रदीप शिरोसे यांच्यासह अन्य दोन तरुण हास्यविनोद करत आपसात चर्चा करत होते.
मात्र, समोरील प्रवाशांनी गैरसमज करून घेतला. दत्ता भोईर आणि त्यांचे मित्र चिडवत असल्याचा समज करून त्यांच्यात वाद सुरू झाला. एका प्रवासी गटाने दुसऱ्या प्रवासी गटावर धारदार शस्त्राने हल्ला केला. त्यात दत्ता भोईर आणि प्रदीप शिरोसे गंभीर जखमी झाले. भोईर यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.