रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे कल्याणमधील प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2022 03:10 PM2022-04-30T15:10:28+5:302022-04-30T15:15:01+5:30
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रिक्षा चालकांकडून प्रवासी भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारणे, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन ...
कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका क्षेत्रातील रिक्षा चालकांकडून प्रवासी भाडे नाकारणे, मनमानी पद्धतीने प्रवासी भाडे आकारणे, प्रवाशांसोबत उद्धट वर्तन अशा तक्रारी वाढत असल्याने प्रवासी अक्षरश: हैराण झाले आहेत.
रिक्षांची अमाप संख्या, वाहतूक यंत्रणावर वाढलेला ताण, हतबल आरटीओ व वाहतूक पोलीस, असे चित्र प्रवाशांना अनुभवास येत आहे. आरटीओची रिक्षा प्रवासी तक्रार हेल्पलाइन बंद आहे. मध्यंतरी कल्याण आरटीओने रिक्षा प्रवासी हेल्पलाइन म्हणून एक व्हॉट्सॲप नंबर जारी केला; पंरतु हा हेल्पलाइन क्रमांक परिणामकारक नाही. यामुळे रिक्षा प्रवाशांनी तक्रार कुठे करायची, असा सवाल ते करीत आहेत. शासनाने रिक्षा परवाने विनाशर्त खुले केल्यामुळे रिक्षाचालकांमध्ये अपप्रवृत्ती बोकाळली असून विना लायसन्स, बॅच अल्पवयीन रिक्षा चालकांचे प्रमाण या व्यवसायात वाढले आहे.
मुंबई शहरात वाहतूक पोलीस व आरटीओ यांची टॅक्सी प्रवासी तक्रार निवारण हेल्पलाइन उपलब्ध आहे. टॅक्सी प्रवाशांची तक्रार ताबडतोब घेऊन वाहतूक पोलीस व आरटीओ यांच्याकडून तक्रारीची खातरजमा करून टॅक्सी चालकांवर कारवाई केली जाते. मुबंई शहरात हेल्पलाइनच्या जनजागृतीसाठी सार्वजनिक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत.
मुंबई वाहतूक पोलिसांच्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात वाहतूक पोलीस व आरटीओ संयुक्तिक रिक्षा प्रवास तक्रार हेल्पलाइन सुरू करावी व हेल्पलाइन क्रमांक सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करावा, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.