मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांतील प्रवासी घटले; बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या खचाखच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 11:38 PM2021-04-24T23:38:02+5:302021-04-24T23:38:16+5:30
कोरोनाची धास्ती : बाहेरगावी जाणाऱ्या गाड्या खचाखच
अनिकेत घमंडी
डोंबिवली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता उत्तरेसह दक्षिणेकडून मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधील प्रवासीसंख्येत घट झाली आहे. मात्र, त्याचवेळी देशभरात अन्यत्र जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, दादर, ठाणे, कल्याण स्थानकांत इतर राज्यांत आपल्या गावी जााण्यासाठी प्रवाशांनी गर्दी केलेली दिसत आहे. रेल्वेच्या आरक्षण तिकिटांच्या चार्टवरूनही ही बाब स्पष्ट होत आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. उत्तर आणि दक्षिणेकडून मुंबई परिसरात सध्या आपत्कालीन परिस्थितीत सुमारे ६० लांब पल्ल्यांच्या गाड्या येत आहेत. त्यातील मुंबई, कल्याण, ठाणे परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे. उत्तर प्रदेश, दक्षिणेकडे जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे तिकडे जाणाऱ्या गाड्या खचाखच भरून जात आहेत. साधारणपणे उन्हाळ्यात या गाड्यांना गर्दी असतेच, पण यंदा काेराेनाच्या धास्तीमुळे या गर्दीत आणखी भर पडली आहे. बहुतांश गाड्यांचे पुढील पंधरवड्यापर्यंत आरक्षण फुल्ल झाले आहे.
त्याउलट स्थिती मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांची आहे. त्या गाड्या सोलापूर, मनमाडनंतर रिकाम्या धावत आहेत.
मुंबई परिसरातील वाढता कोरोनाचा धोका, रद्द झालेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा यामुळे पालक कुटुंबीयांना गावी पाठवण्याच्या मानसिकतेत आहेत. साधारण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुलांच्या परीक्षा संपतात. त्यानंतर गाड्या फुल्ल होतात. यंदा त्याआधीच गाड्यांची आरक्षणे भरलेली आहेत. तसेच येण्याची घाई नसल्याने परतीचे फारसे नियोजन नसल्याचे स्पष्ट झाले आहे.