रिक्षातून फिरणारे प्रवासी निघाले चोर; नंबरप्लेटला रंग फासून फिरायचे, दुकानातील मोठी चोरी उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 01:00 AM2020-12-04T01:00:02+5:302020-12-04T01:00:24+5:30
पोलिसांनी प्राथमिक चाैकशी करुन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजित बहिरे यांच्यासह अन्य एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे
कल्याण : नंबरप्लेटवर पिवळा रंग फासलेली रिक्षा प्रवाशांना घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला असता वेगळीच माहिती समोर आली. रिक्षा चालविणारा तसेच रिक्षातून प्रवासी म्हणून फिरणारे चक्क चोरटे निघाले. या चौघांची चौकशी केली असता त्यांनी एका मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानात चोरी केल्याचे उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कल्याण पश्चिमेतील झुंजारराव मार्केटमध्ये एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून महागड्या वायर चोरून नेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण बानकर यांनी या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्याकडे दिला होता. दरम्यान, रात्रीच्या वेळी एक रिक्षा फिरत असून, तिच्या नंबरप्लेटवर पिवळा रंग फासला असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत या रिक्षाचालकासह प्रवासी म्हणून बसलेले अन्य तिघेही चोर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
पोलिसांनी प्राथमिक चाैकशी करुन आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये बायी यादव, विनय विश्वकर्मा, अभिजित बहिरे यांच्यासह अन्य एका अल्पवयीन चोरट्याचा समावेश आहे. अल्पवयीन चोरट्यास बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून अन्य तीन आरोपींना कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या चाैकशीतून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या चार जणांनी मिळून झुंजारराव मार्केटमधील इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात चोरी केली होती. या गुन्ह्यातील एक लाख ९३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून आणखीन एक गुन्हा उघडकीस आणला असून त्यातील तीन ग्रॅम सोने हस्तगत केल्याची माहिती सरोदे यांनी दिली.