प्रवाशांच्या नशीबी मोडकी तोडकी बस; आधारवाडी चौकात बस झाली ब्रेकडाऊन
By मुरलीधर भवार | Published: October 12, 2023 03:41 PM2023-10-12T15:41:36+5:302023-10-12T15:42:05+5:30
या बसमध्ये प्रवाशांकरीता बसण्यासाठीच्या सीट तुटलेल्या होत्या.
कल्याण-पडघ्याहून प्रवाशांना घेऊन निघालेली राज्य परिवहन महामंडळाची बस आज दुपारी कल्याणच्या आधारवाडी चौकानजीक बंद पडली. प्रवाशांच्या नशीबी मोडक्या तोडक्या बसमधून प्रवास करणे आहे. या मोडक्या तोडक्या बसचा व्हिडिओ प्रवाशांनी काढला आहे. त्यामुळे भंगार झालेल्या बसेस प्रवाशांकरीता चालविला जात असल्याचा आरोप प्रवासी वर्गाकडून केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांची जीव धोक्या येऊ शकतो ही बाब या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाली आहे.
कल्याण बस डेपोतून कल्याण पडघा मार्गावर बस चालविली जाते. ही बस गांधारी मार्गे चालविली जाते. आज कल्याण डेपोतून कल्याण पडघ्याला प्रवासी घेऊन निघाली. ही बस प्रवाशांना पडघ्याला सोडून पुन्हा पडघा येथून प्रवासी घेऊन कल्याणच्या दिशेने निघाली. ही बस कल्याणच्या आधरवाडी चौकात आली असता बंद पडली. दुपारी सव्वा दोन वाजता ही घटना घडली. वाहक चालकाने बस बंद पडल्याने कल्याण बस डेपोला त्याची कल्पना दिली. कल्याण बस डेपोतून पर्यायी बसची व्यवस्था करण्यात आली.
प्रवाशांना बसची व्यवस्था करुन दिली गेली असली तरी दरम्यानच्या काळात प्रवाशांनी बंद पडलेल्या बसचा व्हिडिओ काढला. या बसमध्ये प्रवाशांकरीता बसण्यासाठीच्या सीट तुटलेल्या होत्या. तसेच बसच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या होत्या. त्याचबरोबर चालकाच्या शेजारी असलेला आरसा हा दोरीने बांधलेला होता. प्रवाशांनी व्हिडिओ करुन तोडक्या मोडक्या बसची पोलखोल केली आहे. एसटी महामंडळाची बस ही सामन्यांच्या प्रवाशांचा आधार आहे. मात्र या बसेस तोडक्या मोडक्या असतील तर त्यातून प्रवाशांनी कसा काय प्रवास करायचा. तसेच त्यांच्या जिवीत सुरक्षिततेची काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. कल्याण डेपोला नव्या बसेस मिळालेल्या नाहीत. जुन्या बसेस चालविल्या जातात. त्याची देखभाल दुरुस्ती वेळच्या वेळी केली जात असल्याचा दावा डेपो व्यवस्थापनाकडून केला जात असला तरी आजच्या प्रवाशांच्या व्हिडिओतून तो किती फोल आहे हेच त्यातून उघड झाले आहे. या संदर्भात कल्याण बस डेपोचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याकडे विचारणी केली असता त्यांनी या विषयी माहिती घेऊन सांगतो असे सांगितले.