केडीएमसीची करणी; कधी होणार इथल्या खड्डयांत भरणी?
By प्रशांत माने | Published: October 11, 2023 02:32 PM2023-10-11T14:32:07+5:302023-10-11T14:32:16+5:30
सावित्रीबाई फुले नाटयगृहाची वाट अधिकच खडतर!
डोंबिवली: ऐन गणेशोत्सवात रस्त्यांवरील खड्डयांची समस्या कायम राहिली असताना नवरात्रौत्सवाच्या धर्तीवर शहरातील खड्डयांत गेलेल्या रस्त्यांवर डांबराचे पॅचवर्क करायला सुरूवात झाली आहे. दरम्यान पूर्वेतील महत्वाच्या आणि सावित्रीबाई फुले नाटयगृहाच्या बाहेरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांकडे केडीएमसीचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा नाटयरसिकांमध्ये आहे. इतर ठिकाणी डांबराचे पॅचवर्क सुरु झाले पण या रस्त्याच्या दुर्दशेकडे झालेला कानाडोळा पाहता कधी होणार इथल्या खड्डयांत भरणी? असा सवाल केला जात आहे.
सावित्रीबाई फुले नाटयगृहाच्या बाहेरील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळयात खड्डयांमध्ये पाणी भरून त्याच्या खोलीचा अंदाज येत नव्हता तेव्हा वाहने विशेष करून दुचाकींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सध्या खड्डयांसह धुळीचा त्रास होत आहे. हा रस्ता समपातळीत नाही. ओबडधोबड रस्ता आणि खड्डे यातून नाटयरसिक तसेच तेथून मार्गस्थ होणा-या वाहनांना वाट काढत इच्छीतस्थळी जावे लागत आहे. सावित्रीबाई फुले नाटयगृहाकडून बंदीश पॅलेसकडे जाणा-या रस्त्याची पुरती वाताहत झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला खड्डयांसह खडी देखील पसरल्याने वाहन मार्गस्थ होताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच स्थानिक प्रशासनाला जाग येणार का? याकडेही नाटयरसिक तसेच वाहनचालक लक्ष वेधत आहेत.