पत्रीपूल जानेवारीत होणार खुला, खासदारांनी रात्र काढली जागून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 06:09 AM2020-11-24T06:09:08+5:302020-11-24T06:09:25+5:30
मध्यरात्री घेतला मेगा ब्लॉक : खासदारांनी रात्र काढली जागून
कल्याण : कल्याण पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी रविवारी दुपारी वेळ अपुरी पडल्याने १० टक्के काम अपूर्ण होते. या कामाच्या पूर्ततेसाठी मध्यरात्री रेल्वेने विशेष मेगाब्लॉक घेऊन हे काम साेमवारी पहाटे ६ वाजता पूर्ण करण्यात आले आहे. ७०० टन वजनाच्या गर्डर लाँचिंगची मोहीम अखेर फत्ते झाली आहे. पत्रीपुलाची अन्य कामे डिसेंबर अखेपर्यंत पूर्ण करून जानेवारीत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल,असे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
पत्रीपुलाच्या भल्या मोठ्या गर्डर लॉंंचिंगसाठी २१ आणि २२ नोव्हेंबर या दोन दिवसांत प्रत्येकी चार तासांचा रेल्वेने मेगाब्लॉक घेतला होता. पहिल्या दिवशी चार तासांत गर्डर ४० मीटर पुढे सरकवण्यात आला होता. उर्वरित गर्डर सरकवण्याचे काम रविवारी करण्यात आले. दादर येथे उद्यान एक्स्प्रेस बंद पडल्याने रेल्वे मेगाब्लॉकला विलंब झाला. त्यामुळे वेळ अपुरी पडून १८ मीटर गर्डर सरकवण्याचे काम शिल्लक होते. त्यामुळे रेल्वेने तातडीने ब्लॉक द्यावा, अशी मागणी खासदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे दुपारीच केली होती. रविवारी रात्री १.३० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हा विशेष ब्लॉक घेण्यात आला. विशेष ब्लॉक घेतल्यानंतरही काही तांत्रिक अडचणी येत होत्या. ब्लॉकची वेळ संपल्यानंतरही हे काम सावधानता व सुरक्षितता बाळगून सुरू होते. १ वाजून ४५ मिनिटांनी सुरू झालेले काम पहाटे ६ वाजता पूर्ण झाले.
शिवसैनिकांनी फाेडले फटाके
n खासदार शिंदे यांच्यासाेबत रात्रभर शिवसैनिक व पदाधिकारीही उपस्थित होते. काम पूर्ण होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून कामपूर्तीचा आनंद व्यक्त करून जल्लोष केला. खासदार शिंदे यांनी रेल्वे प्रशासनातील अधिकारी, राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे यावेळी आभार मानले.