थूंकपट्टीची कामे ठरताहेत डोकेदुखी, डांबरातून काही तासांतच वाळू झाली वेगळी; धुळधाणीने नागरिक त्रस्त
By प्रशांत माने | Published: August 29, 2022 11:03 PM2022-08-29T23:03:10+5:302022-08-29T23:05:32+5:30
गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील, असा दावा केडीएमसी प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेक भागांतील खड्डे अजूनही भरण्यात आलेले नाही. तर, जेथे डांबराचे पॅच मारले जात आहेत, काही तासांतच उखडले जात आहेत.
डोंबिवली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जात आहे. मात्र, ही डागडुजी निरर्थक ठरत आहे. खड्डे भरण्याची कामे युद्धपातळीवर सुरू असल्याचे चित्र दिसत असलेतरी ही कामे योग्य प्रकारे होतात की नाही, याकडे मात्र केडीएमसी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.
पूर्वेतील मंजुनाथ विद्यालय, लोकमान्य टिळक स्मारक, ब्राम्हण सभा परिसरातील खड्डे शनिवारी रात्री उशिराने डांबरीकरणाने भरण्यात आले. परंतु, काही तासांतच डांबरातून वाळू बाहेर पडली. त्यामुळे धुळधाण आणि दुचाकी घसरण्याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागला. याबाबत नागरिकांनी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे तक्रार करताच तेथे आज पुन्हा डांबरीकरण करण्यात आले.
गणेशोत्सवापूर्वी खड्डे भरले जातील, असा दावा केडीएमसी प्रशासनाने केला आहे. परंतु, अनेक भागांतील खड्डे अजूनही भरण्यात आलेले नाही. तर, जेथे डांबराचे पॅच मारले जात आहेत, काही तासांतच उखडले जात आहेत. त्यामुळे तेथील डांबरातून वाळू बाहेर पडून असल्याने दुचाकी घसरण्याचाही धोका निर्माण झाला आहे. ब्राम्हण सभा ते मंजुनाथ विद्यालय या रस्त्यावर हे चित्र रविवारी पाहायला मिळाले. शनिवारी मध्यरात्री या ठिकाणचे खड्डे भरले, मात्र ही तात्पुरती केलेली डागडुजी कामाचे पितळ उघड करणारी ठरली.
‘आयुक्तांनी गांभीर्याने लक्ष घालावे’
येथील रहिवासी अजय घरत यांनी याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ दांगडे आणि लोकप्रतिनिधींना पाठवले. त्यानंतर आज तातडीने तेथे पुन्हा डांबर टाकण्यात आले.
- अधिकाऱ्यांचे सुरू असलेल्या कामाकडे लक्ष नाही. थूंकपट्टीची कामे सुरू आहेत. गुणवत्तेकडे पाहिले जात नाही, ही बाब प्रकर्षाने जाणवते. याचा नाहक त्रास नागरिकांना होत आहे. आयुक्तांनी यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी घरत यांनी केली.
- याबाबत ‘लोकमत’ने केडीएमसीच्या गृहनिर्माण आणि प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता रस्त्याची माहिती घेऊन सांगते, असे त्या म्हणाल्या.