हाेळी निमित्त एक पाेळी अनाथांसाठी; पाॅज संस्थेचा अनाेखा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2022 04:54 PM2022-03-17T16:54:38+5:302022-03-17T16:56:53+5:30
होळीच्या दहनात पुरण पोळ्या अर्पण करण्याऐवजी त्या गरीब गरजू लोकांना वाटल्या
कल्याण: हाेळी सण म्हणजे रंगांची उधळण आणि पुरण पोळीचा स्वाद ! परंतु गेल्या सहा वर्षांप्रमाणे paws संस्थेने या वर्षी देखील पर्यावरण पूर्वक आणि सामाजिक बांधिलकी ठेवणारी होळी आणि रंगपंचमी साजरी केली. पॉज संस्थेच्या साधना सभरवाल, ऋषिकेश सुरसे आणि संस्थापक निलेश भणगे यांनी अगदी अनोख्या पद्धतीने साजरी केली.
होळीच्या दहनात पुरण पोळ्या अर्पण करण्याऐवजी त्या गरीब गरजू लोकांना वाटण्याची व्यवस्था केली, ह्यात सुमारे ३०० पुरण पोळया गोळा केल्या आणि त्या गरीब गरजूना अनाथ आश्रमात वाटप केल्या तसेच लोकांना आव्हानही केले की पुरण पोळी वाटून आनंद साजरा करा आणि लाकडे न तोडता, झाडांच्या फांद्या न छाटता, पालापाचोळा गोळा करून त्याची होळी साजरी करा. संस्थापक निलेश भणगे यांनी पुढे असे सांगितले की पाण्याची नासधूस करून रंगपंचमी खेळण्याएवजी ते पाणी रस्त्यावरील झाडांना घालून पर्यावरणपूर्वक होळी साजरी करा.
पॉज संस्थेतर्फे यावर्षीदेखील झाडे न तोडण्याविषयी चे पोस्टर सर्व सोशल मीडिया वर प्रदर्शित करण्यात आले. या उपक्रमामध्ये पॉज संस्थेबरोबर रोट्रॅक्ट क्लब ऑफ बदलापूर इंडस्ट्रिअल तसेच आर के.( डोंबिवली ) वृध्द आश्रम यांनी सहभाग घेतला. गेली सहा वर्षे पॉज ही संस्था सामाजिक आस्था असणारी होळी आणि पर्यावरण पूर्वक रंगपंचमी साजरी करण्यात पुढाकार घेत असते आणि या उपक्रमाला ठाणे जिल्ह्यातून दर वर्षी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असतो. Paws च्या ह्या कार्यक्रमाची स्फुर्ती घेऊन आता सर्वच पर्यावरण प्रेमी संस्था असे विविध सामाजिक उपक्रम राबवताना दिसून येतात