कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहक महावितरणच्या रडारवर
By मुरलीधर भवार | Published: June 1, 2023 06:10 PM2023-06-01T18:10:27+5:302023-06-01T18:11:38+5:30
कल्याण परिमंडलात पाच महिन्यात ५९१ जणांविरुद्ध वीजचोरीचे गुन्हे दाखल
कल्याण : कल्याण परिमंडलात थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक महावितरणच्या रडारवर आहेत. या ग्राहकांच्या वीजपुरवठ्याची सद्यस्थिती तपासण्यात येत असून अनधिकृत वीजवापर आढळणाऱ्या ठिकाणी कारवाई सुरू आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यात परिमंडलातील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ५९१ जणांविरुद्ध वीज कायदा-२००३ च्या कलम १३५ अथवा १३८ नुसार वीजचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याण परिमंडलात मार्च-२०२३ अखेर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले ३ लाख ६ हजार ५५ ग्राहक होते व त्यांच्याकडे २७३ कोटी ८४ लाख रुपयांची थकबाकी होती. एप्रिल महिन्यात यातील ४ हजार ४६७ ग्राहकांनी २ कोटी ९६ लाख रुपये व मे महिन्यात ११ हजार ६२७ ग्राहकांनी २ कोटी ५१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. अजूनही २ लाख ९२ हजार ६८४ ग्राहकांकडे २६८ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे.
कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत (कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली विभाग) ३७ हजार ११ ग्राहकांकडे ३१ कोटी ६८ लाख रुपयांची थकबाकी आहे. कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत (कल्याण ग्रामीण, उल्हासनगर एक आणि दोन विभाग) ८४ हजार ३३८ ग्राहकांकडे ७९ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. पालघर मंडल कार्यालयांतर्गत (पालघर विभाग) ६४ हजार ७७७ ग्राहकांकडे ४८ कोटी ९३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर वसई मंडल कार्यालयांतर्गत (वसई आणि विरार विभाग) १ लाख ६ हजार ५२८ ग्राहकांकडे १०८ कोटी ४९ लाख रुपये थकीत आहेत.
कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडून थकीत वीजबिल आणि विजेचा चोरटा वापर, यामुळे महावितरणचे दुहेरी नुकसान होत आहे. थकीत रक्कम भरून सन्मानाने वीजवापर करण्याचे आवाहन महावितरणने कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना केले आहे.