"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
By अनिकेत घमंडी | Published: May 23, 2024 05:50 PM2024-05-23T17:50:41+5:302024-05-23T17:55:30+5:30
मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांशी याबाबत चर्चा झाली, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची डोंबिवली स्फोटानंतर प्रतिक्रिया
डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करण्यात येणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली असून लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.
डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान नावाच्या रासायनिक कंपनीत आज दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाची माहिती मिळताच कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या स्फोटात सुमारे ३० जण जखमी झाले असून या सर्वांवर खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत, या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
या स्फोटातील जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेण्यासोबतच स्फोटामुळे नुकसान झालेल्या रहिवाशांना पंचनामा करून आठवडाभरात नुकसान भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याचं यावेळी खासदार शिंदे म्हटलं तर डोंबिवली एमआयडीसीत वारंवार होणाऱ्या दुर्घटना आणि त्यामुळे रहिवासी भागाला निर्माण झालेला धोका लक्षात घेत डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांचे ए, बी, सी असे वर्गीकरण करून अतिधोकादायक कंपन्यांचे शहराबाहेर कायमस्वरूपी स्थलांतर केले जाईल, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचंही खासदारांनी सांगितले.
डोंबिवली येथील कंपनीत बॉयलर स्फोट होऊन भीषण आग, घटनास्थळावरील हादरवणारा व्हिडिओ #DombivliBlast#MIDCpic.twitter.com/jWIN99HVNd
— Lokmat (@lokmat) May 23, 2024
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मनसेचे आमदार राजू पाटील, आमदार निरंजन डावखरे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.