रिंग रोडच्या टप्पा ३ चे काम लवकर हाती घेणार; पावसाळ्यापूर्व रस्ते विकासाची कामे मार्गी लावा
By मुरलीधर भवार | Published: April 5, 2024 08:55 PM2024-04-05T20:55:57+5:302024-04-05T20:56:08+5:30
केडीएमसी आयुक्तांचे आदेश, आयुक्तांनी घेतली आढावा बैठक
कल्याण- विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३६० कोटी रुपयांची रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाची कामे प्रगती पथावर आहेत. यात एमएमआरडीएकडून २४ रस्त्यांची आणि महापालिकेकडून ७ रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. याच बरोबर रिंगरोडच्या टप्पा ३ चे काम हाती घेण्यात येत आहे या कामात भेडसावणा-या विविध अडचणीचा आढावा घेऊन पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड़ यांनी आज सर्व सबंधितांची आढावा बैठक घेतली.
बैठकीत या कामातील बाधित बांधकामांच्या निष्कासनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित उप आयुक्त आणि प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांना तसेच भूसंपादन, जागेच्या अडचणीसंदर्भात नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालक दिशा सावंत यांना देण्यात आले. डोंबिवली येथे महानगर गॅस मार्फत करण्यात येणा-या खोदाईबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित सर्व कामे पुढील आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त जाखड़ यांनी महानगर गॅसच्या प्रतिनिधीना दिले. या कामात असलेले विद्युत टान्सफॉर्मर, जल आणि मलवाहिन्या यांच्या अडचणी संदर्भात एकमेकांच्या सहकार्याने मार्ग काढून काम कालबध्द पद्धतीने करण्याच्या सूचना संबधित अभियंत्याना दिल्या आहेत. पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात कामे पूर्ण करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले.
या बैठकीस शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता कोरगावकर, अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, कार्यकारी अभियंता देवरे, महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगररचना दिशा सावंत, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, मनोज सांगळे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, परिमंडळ उप आयुक्त प्रसाद बोरकर, रमेश मिसाळ, संबधित प्रभाग क्षेत्र अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी आदी अधिकारी उपस्थित होते.