शिंदे गटाच्या बॅनरवर भाजपाच्या आमदारांचा फोटो; एका आमदारांसोबत भांडण तर दुसऱ्या आमदारांना शुभेच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2023 07:51 PM2023-09-20T19:51:20+5:302023-09-20T19:51:36+5:30
कल्याण डोंबिवली शहरात शिंदे गट आणि भाजपामध्ये राजकीय पिंगा सुरू आहे.
मयुरी चव्हाण
कल्याण डोंबिवली शहरात शिंदे गट आणि भाजपामध्ये राजकीय पिंगा सुरू आहे. कल्याणात तर भाजपाचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गट शिवसेनेचे कल्याण पूर्वेचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यात तर जोरदार राजकीय घमासान सुरू आहे. एकिकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र महेश गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. एकीकडे एका भाजपा आमदारांशी काहीही सूर जुळत नसताना दुसरीकडे मात्र चव्हाण यांना थेट शुभेच्छा देत शिंदे गटाने युती पालन करत गणपत गायकवाड यांना चेकमेट करण्याचा प्रयत्न केला आहे.
बुधवारी आमदार रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस होता. यानिमित्ताने डोंबिवली नजीक असलेल्या काटई नाक्यावर एक बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरवर चव्हाण यांच्यासह मनसेचे आमदार राजू पाटील यांचाही फोटो आहे. त्यामुळे एकीकडे टीका करायची अन् दुसरीकडे शुभेच्छा द्यायच्या असच चित्र दिसून आलं. आता शिंदे गटाकडूनही विशेषतः कल्याण पूर्वेतून चव्हाण यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. मात्र कल्याण पूर्वेत भाजपा आमदार आणि शिंदे गट यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. नुकतेच भाजपाच्या एका कार्यक्रमातही आमदार गायकवाड यांनी शिंदे गटाच्या गुंड पदाधिकाऱ्यांना पोलीस संरक्षण दिले जाते अस जाहीरपणे विधान केले होते. या विधानावर शिंदे गटाकडूनही तिखट प्रतिक्रिया देण्यात आली..मात्र आता ही दरी वाढेल अस वाटत असताना आज दिलेल्या शुभेच्छांनी या राजकाराण्यांच्या मनात आहे तरी काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.