डोंबिवलीत शिंदे अन् ठाकरेंचाही फोटो, शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेची सर्वत्र चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 03:17 PM2022-10-28T15:17:23+5:302022-10-28T15:38:27+5:30
डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाला आहे
डोंबिवली - शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर आता हा वाद शाखा ताब्यात घेण्यावरुनही सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट समर्थकांमधून विस्तव जात नसल्याचे दृश्य डोंबिवलीत गुरुवारी दिसून आले, बुधवारी दिवाळी होताच शिंदे गटाने येथील मध्यवर्ती शिवसेना शाखेचा सकाळीच ताबा घेतला. त्यामुळे अल्पवधीतच राजकीय वातावरण तंग झाल्याने शहरात या घटनेची प्रचंड चर्चा सुरू होती. आज पुन्हा एकदा हा वाद उफाळून आला. मात्र, आज डोंबिवलीतील या शाखेत शिवसेनेच्या सर्वच नेत्यांचे फोटो पाहायला मिळाले. त्यामध्ये, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचेही फोटो दिसून आले.
डोंबिवली मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात आज पुन्हा एकदा वाद झाला आहे. साधारण अडीच महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा फोटो उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी काढला होता, त्यावरूनच ठिणगी पेटली होती. त्यानंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी शाखेवर ताबा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो लावले होते. मात्र वाढता तणाव पाहत पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना वेगवेगळे कार्यालय दिले होते. त्यानंतर हा वाद काही काळासाठी थांबला. पण, आज सकाळी हा वाद पुन्हा पेटला असून शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी कायदेशीर प्रक्रिया करत शाखेचा करारनामा आपल्या नावावरती असल्याचे सांगत आज या शाखेवरती ताबा घेतला. मात्र, ताबा घेतल्यानंतर ही उद्धव ठाकरे असतील आदित्य ठाकरे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि खासदार श्रीकांत शिंदे असतील यांचे फोटो मध्यवर्ती शाखेवर लावले असल्याचे दिसून आल्याने राजकीय वर्तुळत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी वाद रंगला
दिवाळीच्या दुसऱ्याच दिवशी ही राजकीय घडामोड अतिशय वेगाने झाली. मध्यवर्तीवर सकाळीच शिंदे गटाचे शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ माजी नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, राजेश।कदम, विश्वनाथ राणे, महेश पाटील आदींसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी आल्याने राजकीय घडामोड होणार हे स्पष्ट झाले होते, त्या पाठोपाठ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक कविता गावंड, शहरप्रमुख विवेक खामकर हे मध्यवर्ती शाखेत आले, शाखा ही शिवसेनेची असून तिला ताब्यात घेता येणार नाही असे गावंड यांनी सांगितले, तसेच खामकर यांनीही ठाकरेंनी जबाबदारी दिली असून ती पार पाडणे हे प्रमुख असल्याने जे काही विषय आहेत ते चर्चेने सोडवावे, दादागिरी भाईगिरी कोणी करू नये असे म्हणाले.