दगडांवर अधिकाऱ्यांची नाव लिहून भरले खड्डे; मनसेचे अनोखे आंदोलन
By प्रशांत माने | Published: September 26, 2023 04:06 PM2023-09-26T16:06:12+5:302023-09-26T16:07:03+5:30
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजविले जातील असा दावा केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी केला होता.
कल्याण: कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खडडे गणेशोत्सवात जैसे थे राहिले असताना मंगळवारी कल्याणच्या ग्रामीण भागातील निळजे आणि एमआयडीसी निवासी भागात केडीएमसी प्रशासनातील अधिका-यांची नावे दगडांवर लिहून ते दगड खड्डयांमध्ये टाकून मनसेने अनोखे खड्डे भरो आंदोलन छेडले.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यातील खड्डे बुजविले जातील असा दावा केडीएमसी आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांनी केला होता. परंतू गणपतींचे आगमन खड्डेमय मार्गावरून झाले असताना आता विसर्जन देखील त्याच स्थितीत होत असल्याने आयुक्तांचा दावा फोल ठरला आहे. दरम्यान मनसेचे आमदार राजू पाटील यांचा आज वाढदिवस होता.
माझ्या वाढदिवसानिमित्त बॅनर लावण्याऐवजी रस्त्यांवरील खड्डे भरा जेणेकरून नागरिकांचे आशिर्वाद तुम्हाला आणि मला लाभतील असे आवाहन पाटील यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांना केले होते. पाटील यांच्या आवाहनानुसार आज निळजे आणि एमआयडीसी निवासी भागात मनसेच्या वतीने हे अनोखे खड्डे भरो आंदोलन छेडण्यात आले.