"नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत धोरण शेतकरी आणि गरीब विरोधी; हिटलर मेल्याची वार्ता मला खोटी वाटते"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 07:34 PM2021-10-16T19:34:01+5:302021-10-16T19:37:17+5:30
पंतप्रधान मोदी यांचे परराष्ट्रीय धोरण चांगले असून त्यांनी चीन व पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू थोपवून धरले असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी आज येथे व्यक्त केले.
कल्याण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशांतर्गत धोरण शेतकरी आणि गरीब विरोधी आहे. त्यामुळे ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. मात्र परराष्ट्रीय धोरण चांगले असून त्यांनी चीन व पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू थोपवून धरले असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस (Dr Shripal Sabnis) यांनी आज येथे व्यक्त केले.
कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयात लेखक गंगाधर मेश्रम यांच्या ओठावरील हायकूंचा आस्वाद या पुस्तकाचे प्रकाश डॉ. सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी डॉ. सबनीस यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या कार्यक्रमास हायकूकार राजन पोळ, अजित महाडकर, मोसिन मिरसिंगे, सलिम मिरसिंगे आणि भिकू बारस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. सबनीस यांनी सांगितले की, हिटलर मेल्याची वार्ता मला खोटी वाटते. कारण अमेरिका, रशिया आणि चीन हे तीन अणूअस्त्रधारी देशा साम्राज्यवादाची लढाई करीत आहे. त्यामुळे जगातील स्वातंत्र्य आणि शांतता धोक्यात आाली आहे. हे तिन्ही देश हिटलरच्या रुपाने जिवंत आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुगांतून सुटण्यासाठी दया याचिका पत्र लिहिले होते. हा विषय सध्या चर्चिला जात आहे. याविषयी डॉ. सबनीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, महात्मा गांधी यांनी सावरकरांच्या देशभक्तीचा गौरव केला होता. सशस्त्र क्रांती सोडून अहिंसेचा मार्ग धरा असेही सांगितले होते. मात्र सावरकरांच्या हिंदूत्ववादी भूमिकेचे गांधींजीनी समर्थन केलेले नव्हते. महापुरुषांची बदनामी करुन त्यांची राष्ट्रभक्ती ते ब्राह्मण होते म्हणून जानव्यात कुजवावी हे काही बरोबर नाही. त्याचे राजकारण्यांनी भांडवल करावे ही प्रवृती लोकशाहीला घातक आहे. स्वातंत्र्यात सगळ्यांचा सहभाग होता. सावरकरांनी पाच सहा वेळा ब्रिटींशांना पत्र लिहिले. त्यावेळी दया याचनेची पद्धत होती. मात्र त्यांना तुरुंगातून बाहेर येऊन ब्रिटीशांचा प्रतिवाद करायचा होता. या कारणावरुन देशभक्तांची बदनामी करु नये, याकडे डॉ. सबनीय यांनी लक्ष वेधले.