कल्याणमध्ये होऊ द्या चर्चा कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली
By मुरलीधर भवार | Published: October 7, 2023 08:14 PM2023-10-07T20:14:32+5:302023-10-07T20:14:53+5:30
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कल्याण-कल्याण विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हाेऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र उल्हासनगरातील होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात एका व्यकितने पंतप्रधानांच्या विरोधात अपशब्द वापरल्याने कल्याणमधील कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उद्या ८ ते १५ आ’क्टोबर दरम्यान विविध ठिकाणी हाेऊ द्या चर्चा हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाची रितसर परवानगी शहर प्रमुख सचिन बासरे यांच्याकडून पोलिसांकडे मागण्यात आली होती. काही अटी शर्ती घालून पोलिसांनी होऊ द्या चर्चा या कार्यक्रमास परवानगी दिली होती. दरम्यान ५ आ’क्टोबर रोजी उल्हासनगरात हाच कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात पंतप्रधानाच्या विरोधात एका तरुणाने अपशब्दाचा वापर केला होता. त्यामुळे हा कार्यक्रम वादग्रस्त ठरला. त्याची पुनर्रावृत्ती अन्य ठिकाणच्या होऊ द्या चर्चा या कार्यक्रमात होऊ शकते. त्यातून वादंग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. पोलिसांनी कल्याणमधील कार्यक्रमास दिलेली परवानगी नाकारली आहे.
पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर शहर प्रमुख बासरे यांनी पोलिसांनी नाकारलेली परवानगी योग्य नाही. मात्र या प्रकरणात न्यायालयात दाद मागणार आहे.
कल्याण छत्रपती शिवाजी चौकात शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून दहिहंडी साजरी करण्याची परवानगी मागितली होती. पोलिसांनी ठाकरे गटाला परवानगी नाकारल्यानंतर शहर प्रमुख बासरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने छत्रपती शिवाजी चौकातपासून हाकेच्या अंतरावर दहिहंडी साजरी करण्याचे आदेश दिले होते. दहिहंडी पाठोपाठ किल्ले दुर्गाडीवर नवरात्र उत्सव साजरा करण्याची परवानगी दोन्ही गटाकडून मागण्यात आली आहे. ही परवानगी मिळणे बाकी आहे. त्या पाठोपाठ आता होऊ द्या चर्चा या कार्यक्रमाची परवानगी पोलिसांनी नाकारल्यावर ठाकरे गटाकडून पुन्हा न्यायालयाचे दार ठोठावले जाणार आहे.