डोंबिवलीत रोषणाई केली म्हणून मनसेला पोलिसांची नोटिस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 12:56 AM2021-11-03T00:56:27+5:302021-11-03T00:57:29+5:30
Police notice to MNS : संतप्त मनसे आमदारांनी सत्ताधाऱ्यांना दिला सल्ला, दुसऱ्याची रेषा कमी करुन कोणी मोठे होत नाही
कल्याण- जनतेसाठी ही रोषणाई आहे. रोषणाईचे श्रेय घेऊ नये म्हणून नोटीस दिली, अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. काही लोकं कोत्या मनाचे असतात. त्यांच्याकडून आम्ही जास्त अपेक्षा ठेवत नाही. त्यांनी त्यांची रेषा मोठी करावी. दुसऱ्याची रेषा कमी करुन कोणी मोठा होत नाही असा सल्ला दिवाळी निमित्त मनसे आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
यंदा कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाला आहे. कोरोनाचे नियम पाळून सण साजरा करावा असे आवाहन सरकारकडून केल जात आहे. या पाश्र्वभूमीवर यंदाच्या वर्षी डोंबिवलीच्या फडके रोडवर दिवाळी पहाट साजरी केली जाणार अशी चर्चा सुरु झाली होती. मात्र पोलिसांनी या कार्यक्रमास परवानगी नाकारली. आयोजकांना दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करावा लागला. मनसेकडूनहीडोंबिवली अप्पा दातार चौकात दिवाळी पहाट साजरी केली जाते. त्यालाही परवानगी नाकारल्यावर आमदार पाटील यांनी सावित्रीबाई नाटय़गृहात दिवाळी पहाटेचा कार्यक्रम करण्याचा निर्णय घेतला. 4 तारखेला ही दिवाळी पहाट बंदीस्त नाटय़गृहात होणार आहे. त्या आधी मनसेने आज सायंकाळी अप्पा दातार चौकात दिपोत्सव साजरा केला. त्यासाठी मनसेने त्या परिसरात संपूर्ण रोषणाई केली आहे. या रोषणाईचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते पार पडला. मात्र या कार्यक्रमाच्या आधीच मनसे शहराध्यक्षांना पोलिसांनी नोटिस बजावली.
या नोटिससंदर्भात बोलताना आमदार पाटील संतापले. नोटिस पोलिस देतात. मात्र त्याचा आका कोणी दुसराच आहे. ही रोषणाई जनतेच्या आनंदासाठी आहे. या रस्त्यावर दोन दिवसापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. त्या आंदोलन कत्र्याना कोणत्याही प्रकारीच नोटिस दिली गेली. मनसेच्या रोषणाईचे श्रेय मिळू नये यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत.