गावठी दारुच्या भट्टीवर पोलिसांनी टाकला छापा, साडेसात लाखाची गावठी हातभट्टीची दारू जप्त
By मुरलीधर भवार | Published: January 20, 2024 04:06 PM2024-01-20T16:06:10+5:302024-01-20T16:06:47+5:30
या छाप्यादरम्यान गावठी दारुची हातभट्टी चालवणाऱ्या एकाने पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
कल्याण - मलंगड परिसरातील कुंभार्ली गावातील शेतातील झाडी झुडपात असलेल्या बेकायदेशीर गावठी दारूच्या हातभट्टीवर कल्याण क्राईम ब्रांचने धडक कारवाई केली आहे. या कारवाई दरम्यान कल्याण क्राईम ब्रांचने तब्बल सात लाख चाळीस हजार रुपयांची गावठी हातभट्टीचे दारू आणि दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले असून ही हातभट्टी पेटवून उध्वस्त केली.
या छाप्यादरम्यान गावठी दारुची हातभट्टी चालवणाऱ्या एकाने पळ काढला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मलंगगड परिसरात कुंभार्ली गावाजवळील शेतात झाडीझुडपात बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे कल्याण क्राईम ब्रांचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार, पोलीस अधिकारी संदीप चव्हाण, पोलीस हवालदार विश्वास माने, दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे यांच्या पथकाने या हटभट्टीवर छापा टाकला. त्याठिकाणी गावठी दारू, गावठी दारू बवण्याचे साहित्य, असा एकूण ७ लाख 4४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हातभट्टी पेटवून नष्ट केली. या छाप्या दरम्यान हातभट्टी चालवणारा इसम पसार झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत .या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.