मतदाराच्या नावांची पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे, पालिकेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2021 10:57 AM2021-11-04T10:57:47+5:302021-11-04T14:29:39+5:30
KDMC : महापालिका भवनात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केलं आहे.
कल्याण : प्रारूप मतदान यादीतील मतदाराच्या नावांची पडताळणी करण्यासाठी आणि नवमतदारांची व दिव्यांगांची मतदार यादीत नोंदणी करण्यासाठी राजकीय पक्षांनी सहकार्य करावे , असं आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी केलं आहे.
महापालिका भवनात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने संपन्न झालेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत त्यांनी हे आवाहन केलं आहे. ही बैठक मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत/ मतदारांपर्यंत पोचण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी तसेच त्याबाबतची माहिती सर्व पक्षांना अवगत करन्यासाठी आयोजित करण्यात आली होती. दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर या काळात राबविल्या जाणाऱ्या या मतदार पुनरीक्षण अभियानात नवीन नाव नोंदविणे, नावे वगळणे, मतदाराचे नाव दुरुस्त करणे ही कामे करता येणार आहेत.
राजकीय पक्षांनी प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यावर त्याची आपल्या स्तरावर पडताळणी करून सहकार्य करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. प्रारुप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत यादीबाबत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत. 20 डिसेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती निकालात काढून 5 जानेवारी 2022 पर्यंत मतदार यादी अंतिम करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.
1 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या नागरिकास मतदानाचा हक्क प्राप्त होणार आहे. महानगरपालिकेने महानगरपालिकेच्या दहा प्रभाग कार्यालयातील नागरी सुविधा केंद्रात मतदान नोंदणी अर्ज नागरिकांसाठी/ मतदारांसाठी उपलब्ध करून ठेवले आहेत.