पूल जनतेच्या सोयीसाठी की पक्षाच्या श्रेयासाठी; आमदार राजू पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्विट
By प्रशांत माने | Published: February 29, 2024 06:39 PM2024-02-29T18:39:58+5:302024-02-29T18:41:45+5:30
मोठा गाव ठाकुर्ली- माणकोली खाडीपूल हा डोंबिवली आणि ठाणे शहरांना जोडणारा आहे.
डोंबिवली: डोंबिवली आणि ठाण्याला जोडणारा मोठा गाव ठाकुर्ली माणकोली खाडी उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. पण हा पूल जनतेच्या प्रवासाकरीता खुला केला जात नाही. ‘जनतेच्या प्रवासाला श्रेयवादाचा खोडा’ पूल जनतेच्या सोयीसाठी बांधला होता की पक्षाच्या श्रेयासाठी? असे व्टीट मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना केले आहे. पूलाचे काम पूर्ण झाल्याचे दिसत असतानाही पाटील यांच्या व्टीटची दखल घेऊन तरी मुख्यमंत्र्यांकडून या पूलाचे लोकार्पण होणार की नाही याबाबत चर्चा रंगली आहे.
मोठा गाव ठाकुर्ली- माणकोली खाडीपूल हा डोंबिवली आणि ठाणे शहरांना जोडणारा आहे. अवघ्या १५ मिनिटात डोंबिवलीतून ठाणे गाठता येणार आहे. या पूलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र या पूलाचे लोकार्पण केले जात नाही. या पूलाच्या कामाच्या भूमिपुजनाला देखील शिवसेना आणि भाजपमध्ये स्पर्धा लागली होती. आता दोन्ही पक्ष सत्तेत आहेत. पूलाचे काम पूर्ण होऊन तो उदघाटनाच्या प्रतिक्षेत असतानाही आता त्यांच्याकडूनच श्रेयवादासाठी पूलाचे लोकार्पण रखडवून ठेवण्यात आल्याचा आरोप मनसेचे आमदार पाटील यांनी व्टीटद्वारे केला आहे. पूल जनतेसाठी बांधला होता की, श्रेयासाठी ? असा सवाल देखील पाटील यांनी केला आहे.
माणकोली पूलाचे श्रेय बळकावण्यासाठी दोन्ही सत्ताधा-यांमध्ये जोरदार होड सुरु आहे. राज साहेब म्हणतात तेच खरं आहे. जनतेला राग येत नाही. म्हणून हे सत्ताधारी जनतेला वेठीस धरतात. शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री, उपमुख्यमत्री आणि अन्य मंत्री डोंबिवलीत येणार आहेत. तर पूल नागरीकांना खुला करुन जनतेची ट्रॅफिकच्या कटकटीतून सुटका तरी करा. ज्यांना श्रेय घ्यायचे आहे. त्यांनी घेऊन टाका आणि कृपया आता तरी जनतेला गृहित धरणं सोडा असा शब्दात पाटील यांनी टोला लगावला आहे. दरम्यान ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा निमित्त रविवारी डोंबिवलीत येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काही बोलतात का?याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.