भाजप-मनसे युतीत बिब्बा घालण्याची सेनेची रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 07:30 AM2022-05-07T07:30:34+5:302022-05-07T07:31:06+5:30

कल्याण-डोंबिवलीत फाटाफूट : आक्रमक राजकारण

possibly BJP MNS alliance shiv sena trying attacking politics mns leader raju patil | भाजप-मनसे युतीत बिब्बा घालण्याची सेनेची रणनीती

भाजप-मनसे युतीत बिब्बा घालण्याची सेनेची रणनीती

Next

प्रशांत माने
डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून या पक्षाच्या वाढीकरिता सुपीक प्रदेश राहिलेल्या कल्याण-डोंबिवलीत मनसेला खिळखिळे करण्याच्या दृष्टीने शिवसेनेने हालचाल सुरू केली आहे. पूजा गजानन पाटील व प्रकाश माने या माजी नगरसेवकांना शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश देण्यामागे हेच राजकारण आहे. निवडणुकीपूर्वी अथवा निकालानंतर भाजप व मनसे यांनी एकत्र येऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेत शिवसेनेला आव्हान देऊ नये याकरिता सेनेने तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.

वर्षभरापूर्वी राज ठाकरेंच्या जवळचे मानले गेलेले राजेश कदम आणि मंदार हळबे या दोन शिलेदारांसह शहरातील अन्य पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली. मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात अन्यत्र मनसेला यश लाभले नाही. परंतु कल्याण-डोंबिवली परिसरात मनसेचे राजू पाटील आमदार झाले. याच पाटील यांच्या मतदारसंघात पदाधिकाऱ्यांची गळती सुरू झाली.. माजी नगरसेविकेसह अन्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश हे ‘दबावाचे राजकारण’ असल्याचा आरोप पाटील यांच्याकडून होत असला तरी केडीएमसीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले ‘फुटी’चे राजकारण मनसेच्या मुळावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मनसेची स्थापन २००६ मध्ये झाली. स्थापनेपूर्वी छेडलेल्या आंदोलनाची पहिली ठिणगी कल्याण-डोंबिवलीत पडली आणि तिचा वणवा महाराष्ट्रात पसरला. यामुळे पक्षाला उभारी मिळाली. २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले. त्यामध्ये एक डोंबिवलीतील रमेश पाटील हेही होते. विधानसभा निवडणुकीत काही मतांच्या फरकाने पराभूत झालेल्या राजेश कदम यांनादेखील भरघोस मते मिळाली. २०१० च्या केडीएमसी निवडणुकीत मनसेचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आले. यातील १७ नगरसेवक डोंबिवलीचे होते. नगरसेवक आणि पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांची एकूणच कार्यशैली आपापसातील ‘दरी’ वाढण्यास कारणीभूत ठरली.

शहरप्रमुख राजेश कदम यांना जिल्हाध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली, परंतु ती त्यांनी नाकारली. ही संधी २००९ मध्ये पक्षात नव्याने आलेल्या प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी उचलली. तेव्हापासून पक्षावर पाटलांची हुकुमत आहे. याची प्रचिती २०१५ च्या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाली. पाटील यांचे समर्थक मनोज घरत यांच्याकडे शहराध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. परंतु त्याचवेळी मोदी लाटेमुळे मनसेची २७ नगरसेवकांवरून घसरगुंडी होऊन नऊ नगरसेवक विजयी झाले. मनसेने आता भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. यामुळे पुन्हा मनसेने बाळसे धरले व महापालिका निवडणुकीपूर्वी किंवा नंतर मनसे व भाजपची युती झाली तर सेनेची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे मनसे खिळखिळी करण्याचा प्रयत्न सेनेने सुरू केला आहे.

मनसेच्या एकमेव आमदारासमोर मोठे आव्हान
प्रारंभीच्या काळात मनसेच्या पक्षबांधणीत अग्रणी असलेल्या अनेक सहकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली. राजेश कदम यांच्यासह मंदार हळबे, सागर जेधे, दीपक भोसले, इरफान शेख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचे वर्षभरात पाहायला मिळाले. आता ग्रामीण भागातील माजी नगरसेविका पूजा पाटील, प्रकाश माने आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी पक्षाशी फारकत घेतली. त्यामुळे मनसेचे एकुलते एक आमदार राजू पाटील यांच्यासमोरील आव्हान मोठे आहे.

Web Title: possibly BJP MNS alliance shiv sena trying attacking politics mns leader raju patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.