कल्याण : घनकचरा व्यवस्थापन कर वसूलीस स्थगिती द्या; खासदार कपिल पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:14 PM2021-05-29T18:14:40+5:302021-05-29T18:16:17+5:30
आयुक्तांनी निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा, कपिल पाटील यांची मागणी.
कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कर वसूल करणे सुरु केले आहे. या कर वसूलीस स्थगिती देण्याची मागणी भाजप खासदार कपील पाटील यांनी केली आहे. "मार्च २०२० पासून देशात कोरोनाचे सावट आहे. पहिल्या लाटेच्या वेळी कडक लॉकडाऊन आत्ता दुस:या लाटेच्या वेळी संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरु आहे. हा लॉकडाऊन अद्याप उठलेला नाही. कोरोना काळात नागरीकांचे रोजगार बुडाले आहेत. पगार कपात झालेली आहे. नागरीक आर्थिक विवंचनेत असताना त्यांच्या माथी वर्षाकाठी ७२० रुपये कचरा कर लादणे अयोग्य आहे. हा कर रद्द करण्याच्या प्रकरणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालावे. त्याचबरोबर आयुक्तांनी हा निर्णय रद्द करण्याबाबत पाठपुरावा करावा," अशी मागणी खासदार पाटील यांनी केली आहे.
महापालिका हद्दीत शून्य कचरा मोहिम राबविली जात असली तरी अनेक ठिकाणी कचरा उचलला जात नाही. कचरा कुंडय़ा काढून घेतल्या आहेत. कचरा रस्त्यावर फेकला जात आहे. अनेक चाळीर्पयत कचरा गाडी पोहचत नाही. अशा परिस्थितीत नागरीकांकडून कचरा कर वसूल करणो अयोग्य आहे. याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
डोंबिवलीतील भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी कचरा करास तीव्र विरोध केला आहे. त्यांनी पालकमंत्र्यासह आयुक्तांवर तोफ डागली होती. त्यांच्या मागणीस समर्थन देत मनसेनेही कर रद्द करण्याची मागणी केली होती. जागरुक नागरीक श्रीनिवास घाणोकर यांनीही कर अयोग्य असल्याचे म्हटले होते. या सगळ्य़ा मागण्यांचे समर्थन करत खासदार पाटील यांनीही कर रद्द करण्याची मागणी केल्याने हा कर रद्द केला जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.