पीएफचे ११० कोटी रुपये वसूल करण्यास स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2020 07:40 AM2020-12-20T07:40:50+5:302020-12-20T07:41:24+5:30
Kalyan : २०११ ते २०१६च्या कालावधीत महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे पैसे पीएफ कार्यालयाकडे भरलेले नाहीत.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कंत्राटी कामगारांच्या पीएफचे पैसे पीएफ कार्यालयात भरले नसल्याने ११० कोटी रुपये थकल्याची नोटीस पीएफ कार्यालयाने मनपास बजावली होती. याप्रकरणी महापालिका प्रशासन पीएफ लवादाकडे अपिलात गेले होते. लवादाने कोरोना असल्याने ही रक्कम वसुलीसाठी सक्ती करता येत नाही, असे स्पष्ट करीत वसुलीस ८ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे.
लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी यासंदर्भात माहिती दिली. २०११ ते २०१६च्या कालावधीत महापालिकेतील कंत्राटदारांनी त्यांच्या कंत्राटी कामगारांच्या पीएफचे पैसे पीएफ कार्यालयाकडे भरलेले नाहीत. महापालिकेला पीएफचा अकाउंट नंबर २०१४ मध्ये मिळाला. त्यानंतर मनपाने त्याचा पाठपुरावा करून ही रक्कम भरणे अपेक्षित होते.
महापालिका निविदा कढून विकासकामांचे कंत्राट कंपन्यांना देते. या कंपन्यांनी त्यांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम पीएफ कार्यालयात भरली पाहिजे. मात्र, कंत्राटदारांनी २०११ ते २०१६ या दरम्यान पीएफची रक्कमच भरलेली नाही. मनपाने या कालावधीत किती विकासकामांच्या निविदा मागविल्या याची माहिती पीएफ कार्यालयाने मागितली होती. मात्र, ही माहिती महापालिकेने तातडीने दिली नाही. त्यामुळे पीएफ कार्यालयाने मनपाच्या बॅलन्स शीटच्या आधारे ११० कोटी रुपये पीएफचे थकल्याचे मनपास सांगितले आहे.
विकासकामे महापालिकेने केली आहेत. परंतु, कंत्राटदार ही रक्कम भरण्यास तयार नसल्यास महापालिकेला ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यामुळे ही नोटीस मिळताच महापालिकेने कंत्राटदारांची झाडाझडती सुरू केली आहे. शहर अभियंता कार्यालयातून कंत्राटदारांना पीएफ न भरल्याप्रकरणी नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
मनपा ‘त्या’ कंत्राटदारांना बजावणार नोटीस
- सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात निकाल देताना कोरोना काळात कोणत्याही थकीत वसुलीसाठी सक्ती करता येत नाही, असे स्पष्ट केले होते. केडीएमसीला ११० कोटींच्या थकबाकीची नोटीस मिळाल्याने प्रशासनाने पीएफ लवादाकडे अपील करून याप्रकरणी दाद मागितली होती.
- लवादाने याप्रकरणी बुधवारी निकाल देताना कोरोना काळात सक्तीने रक्कम वसूल करता येत नाही, असे सांगितले. आता या अपिलावर पुढील सुनावणी ८ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे केडीएमसीला तोपर्यंत दिलासा मिळाला आहे.
- दरम्यान, ज्या कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांचा पीएफ भरलेला नाही, अशा कंत्राटदारांना मनपा येत्या सोमवारपासून नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे.