न्यायालयाने फटकारूनही खड्डे जैसे थे; डोंबिवलीत रिक्षा चालकांचे आंदोलन
By अनिकेत घमंडी | Published: August 17, 2023 02:46 PM2023-08-17T14:46:47+5:302023-08-17T14:47:35+5:30
शनिवार पर्यन्त भरणार खड्डे, महापालिका प्रशासनाला आली जाग
डोंबिवली: न्यायालयाने फटकारले, नागरिकांनी पत्र दिली, एकाचा अपघाती मृत्यू झाला परंतु तरीही खड्डे विषयी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासन ढिम्म हलत नसून गेंड्याच्या कातडीचे अधिकारी करतात काय? गलेलठ्ठ पगार घेतात मग काम करायला काय होते, खड्ड्यांमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले आहे असे म्हणत शहरातील रिक्षा चालकांनी गुरूवारी महापालिके विरोधात आंदोलन केले.
शिवसेना शिंदे गट प्रणित रिक्षा चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष शेखर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले, वेळोवेळी सांगूनही केवळ पावसाचें कारण पुढे करण्यात येत असून आता आठवडा झाला पाऊस नाही पण तरीही खड्डे बुजवण्याचे नाव नाही, असे अधिकारी काय कामाचे असा सवाल करून जोशी यांच्यासह रिक्षा चालकांनी महापालिजकेच्या ह प्रभागासमोर आंदोलन केले.
पश्चिमेला सीसी रस्ते नाहीत त्या भागातील डांबरी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत, त्यातून मार्ग काढताना वाहनचलकाना त्रास होतो, विशेषतः रिक्षा चालकांना प्रवासी घेऊन जाताना अपघात।होऊ नये याचे दडपण असते. पण त्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असते, परिणामी रस्त्याची अवस्था गंभीर झाल्याचे जोशी म्हणाले.
रिक्षा चालकांनी उत्स्फूर्त केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शनिवार पर्यन्त कामाला सुरूवात होऊन जास्तीतजास्त खड्डे बुजवले जातील, अद्ययावत तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवून नागरिकांना दिलासा मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे जोशी यांनी जाहीर केले, परंतु पुढील आठवड्यात समाधान कारक सुधारणा दिसली नाही तर मात्र खड्य्यात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.