स्मशानातील वीज पुरवठाच खंडीत, अंधारातच सुरू केले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 08:37 PM2021-10-22T20:37:42+5:302021-10-22T20:38:25+5:30
नातेवाईंकसह नागरिकांची नाराजी, मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती.
कल्याण - कल्याणच्या पूर्व भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी एक मृतदेह आणण्यात आला होता. मात्र, स्मशानभूमीतील वीज गेल्यामुळे या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास अर्धा तास विलंब झाला. त्यामुळे, नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही वीज नेमकी का गेली, हेच कळले नाही. त्यामुळे, वीज कधी येईल याचा थांगपत्ता नसल्याने नातेवाईकांनी मृतदेहावर अंधारातच अत्यंसस्कार करण्यास सुरुवात केली होती.
कल्याण पूर्व भागातील एका वृद्ध महिलेचा मृतदेह अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत गुरुवारी रात्री आणण्यात आला होता. त्यावेळी, वीज पुरवठा खंडीत होता, विशेष म्हणजे त्याठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता. मृताच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्याकडे वीज खंडीत झाल्याबद्दल विचारले असता त्याच्याकडे समर्पक उत्तर नव्हते. त्यावेळी, वीज कधी सुरू होणार हे मृताच्या नातेवाईकांनाही नीट माहीत नसल्याने नातेवाईकींनी टॉर्चच्या सहाय्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासानंतर त्याठीकाणी एक कर्मचारी आला, त्याने वीज पुरवठा सुरळीत केला. अंत्यसंस्काराचा विधी अंतिम टप्प्यात आल्यावर वीज पुरवठा सुरळित झाला. या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांसह उपस्थितांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेची दखल घेत राष्ट्र कल्याण पाटीचे पदाधिकारी राहूल काटकर यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. तसेच नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, यापूर्वीही अशा काही घटना घडलेल्या आहेत. स्मशानभूमीतील डिझेल शवदाहिन्यात तांत्रिक बिघाड झाल्याने कोरोना काळात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी वेटींगला राहावे लागत होते. तसेच डोंबिवलीतील स्मशानभूमीच्या छताचे पत्रे गळके होते. स्मशानभूमी अद्ययावत करण्यासाठी महापालिकेकडून पैसे खर्च केले जातात. मात्र, त्याठिकाणी योग्य सेवा सुविधा पुरविल्या जात नसल्याची बाब या घटनेतून समोर आली आहे. स्मशानभूमीचा पुरवठा खंडीत झाला तरी त्याठिकाणी पर्यायी वीज पुरवठयाची सुविधा किमान अंत्यसंस्कारावेळी तरी असावी, अशी मागणी केली जात आहे.