प्रल्हाद शिंदे यांचे भव्य दिव्यस्मारक व्हावे - आनंद शिंदे
By प्रशांत माने | Published: February 11, 2024 08:45 PM2024-02-11T20:45:50+5:302024-02-11T20:45:58+5:30
लोकगायकाच्या स्मारकाला मिळाली नवी झळाळी
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: प्रल्हाद शिंदे यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे त्यांचे स्मारक असले पाहिजे. इथल्या स्मारकाचे नुतनीकरण होऊन नवीन झळाळी मिळाली असलीतरी याठिकाणी सांस्कृतिक भवन उभारून त्याचे भव्य दिव्य स्मारक व्हायला हवे. येथून एक दोन नव्हे तर दरवर्षी दहा हजार प्रल्हाद शिंदे तयार होऊन बाहेर पडायला हवेत असे प्रतिपादन शिंदे यांचे सुपूत्र तथा ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांनी कल्याणमध्ये केले.
कल्याण शहरातील रहिवासी आणि महाराष्ट्रातील लोकगायक दिवंगत कै प्रल्हाद शिंदे यांच्या कोळवलीतील अर्धवट स्थितीतील आणि दुरवस्थेच्या गर्तेत सापडलेल्या स्मारकाचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या २५ लाखांच्या आमदार निधीतून नुतनीकरण करण्यात आले आहे. नव्या झळाळी मिळालेल्या स्मारकाचे रविवारी संध्याकाळी गायक आनंद शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी आमदार भोईर, माजी महापौर रमेश जाधव, माजी नगरसेवक जयवंत भोईर, प्रभूनाथ भोईर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी गायक शिंदे बोलत होते. ते पुढे म्हणाले बुध्दविहार मोठया संख्येने बनविली जातात पण त्याठिकाणी जर कोणी बुध्द वंदनेला गेले नाही तर त्या बुुध्दविहाराला काही अर्थ नाही. जर हे इथले स्मारक नुसते बांधले तर त्याचा काही उपयोग होणार नाही. येथून कलाकार घडायला हवेत. हे स्मारक प्रल्हाद शिंदे प्रतिष्ठापनच्या ताब्यात दया अशी मागणी आम्ही आधीपासून करीत आहोत. पण आता याठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभे राहिले पाहिजे. यासाठी आमचे देखील सहकार्य लाभेल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी यावेळी प्रल्हाद शिंदे यांनी गायलेले ‘पाऊले चालली पंढरीची वाट’ हे गीत गायले.
प्रल्हाद शिंदे हे सर्वांचेच प्रेरणास्त्रोत आहेत त्यामुळे या स्मारकाचे पुढे मोठया भव्य दिव्य स्मारकात कसे रूपांतर होईल यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासन आमदार भोईर यांनी आनंद शिंदे यांना दिले.
माजी महापौरांचा पाठपुरावा
लोकगायक प्रल्हाद शिंदे यांच्या स्मारकाच्या दुरवस्थेबाबत लोकमतने जून महिन्यात वृत्त प्रकाशित केल्यानंतर माजी महापौर रमेश जाधव यांनी तत्कालीन आयुक्त डॉ भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेऊन सुशोभिकरणाबाबत चर्चा केली होती. जाधव यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे देखील पाठपुरावा केला होता. अखेर २५ लाखांचा आमदार निधी विश्वनाथ भोईर यांनी स्मारकाच्या नुतनीकरणासाठी उपलब्ध करून दिला.