धावत्या मेल समोर मुलासह उडी मारणारे होते, 'बेस्ट'मध्ये नोकरीला; महत्वाची माहिती आली समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 07:32 PM2022-02-17T19:32:30+5:302022-02-17T19:52:16+5:30
घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला.
डोंबिवली : पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या डेक्कन एक्स्प्रेससमोर आपल्या सहा वर्षांच्या मुलासह उडी मारून वडिलांनी आत्महत्या केल्याची घटना घटना विठ्ठलवाडी रेल्वेस्थानकात बुधवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. या घटनेत वडिलांचा जागीच मृत्यू झाला असला तरी मुलगा अपघातातून बचावला आहे. रेल्वे पोलिसांनी त्याला आईच्या ताब्यात दिले आहे. तर, वडिलांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेला आहे.
उल्हासनगरच्या शांतिनगर परिसरात राहणारे प्रमोद आंधळे आपला मुलगा स्वराजसह सायंकाळी ६ च्या सुमारास विठ्ठलवाडी स्थानकात पोहोचले. तेथे धावत्या डेक्कन एक्स्प्रेससमोर प्रमोद यांनी मुलासह उडी मारली. या घटनेत गाडीची धडक बसल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र स्वराज ट्रॅकमधून बाहेर पडल्याने तो या अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावला आहे.
‘बेस्ट’मध्ये होते नोकरीला
प्रमोद आंधळे हे पत्नी, एक मुलगा आणि मुलीसह राहत होते. प्रमोद हे बेस्टमध्ये चालक म्हणून नोकरी करत होते. कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी असताना त्यांनी इतका मोठा निर्णय का घेतला याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.