बाहेरगावच्या लेट गाड्यांना प्राधान्य, लोकलचा खोळंबा; मध्य रेल्वेकडून देण्यात आली कबुली 

By अनिकेत घमंडी | Published: August 16, 2024 07:09 AM2024-08-16T07:09:45+5:302024-08-16T07:10:39+5:30

रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही तारेवरची कसरत, अनेक तांत्रिक अडचणींमुळे वेळापत्रक पाळले जात नाही

Preference for outbound late trains, delay of local; Confession given by Divisional Managers of Central Railway  | बाहेरगावच्या लेट गाड्यांना प्राधान्य, लोकलचा खोळंबा; मध्य रेल्वेकडून देण्यात आली कबुली 

बाहेरगावच्या लेट गाड्यांना प्राधान्य, लोकलचा खोळंबा; मध्य रेल्वेकडून देण्यात आली कबुली 

अनिकेत घमंडी, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: देशभरातून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या कसारा, कर्जतला येईस्तोवर आधीच त्यांना विलंब झालेला असतो. त्यामुळे त्या बाहेरगावच्या गाड्यांऐवजी लोकलला प्राधान्य दिले, तर दूरवरून आलेल्यांचा आणखी खोळंबा होईल. त्यामुळे लोकलपेक्षा बाहेरगावाहून येणाऱ्या गाड्यांना अगोदर पुढे जाण्याची संधी दिली जाते.

परिणामी, मुंबईकडे जाणाऱ्या व येणाऱ्या लोकल दररोज उशिरा धावतात, अशी धक्कादायक कबुली मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी दिली. रेल्वेचे वेळापत्रक सांभाळणे ही एक तारेवरची कसरत असून, अनेक तांत्रिक अडचणीमुळे वेळापत्रक पाळले जात नाही. त्याला आमचा नाइलाज आहे, असे आर्जवही गोयल यांनी रेल्वे प्रवासी संघटनेपुढे केले.

प्रशासनाचे रडगाणे

लोकल सेवा दररोज किमान १५ मिनिटे ते कमाल एक तास उशिरा सुरू असल्याच्या निषेधार्थ २२ ऑगस्ट रोजी प्रवासी संघटनांनी आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले. प्रवासी संघटनांनी हे आंदोलन करू नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने बैठक आयोजित केली होती. मात्र, बैठकीत रेल्वे प्रशासनाने स्वतःचेच रडगाणे गायले. परिणामी, प्रवासी संघटनांचा पंचसूत्री कार्यक्रम कागदावरच राहिल्याची खंत दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड.आदेश भगत यांनी व्यक्त केली.

आंदोलनावर ठाम

बैठक ही उपनगरी लोकल प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठीहोती, पण ते सोडून रेल्वेने त्यांच्या तांत्रिक अडचणींचा पाढा वाचला. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्य द्यायचे तर द्या, पण लोकल प्रवासी हे सुमारे ४५ लाख आहेत, त्यांचा विचार प्राधान्याने करायला हवा, अशी प्रतिक्रिया ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली. बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नसल्याने २२ ऑगस्टला आंदोलन करण्यावर संघटना ठाम आहे.

रेल्वे प्रशासनाने एवढी वर्षे एकदाही संघटनांना बोलावले नाही; मात्र, आंदोलनाची हाक दिल्यावर बैठकीला बोलावले. याचा अर्थ त्यांना विरोध नकोय. पण, रेल्वेने समस्या सोडवायला हव्यात. ते सोडून स्वतःचे रडगाणे ऐकवून काय साध्य होणार? आम्हाला जादा लोकल फेऱ्या हव्यात, त्याचे काय करता ते सांगा.
- मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था (महासंघ)

Web Title: Preference for outbound late trains, delay of local; Confession given by Divisional Managers of Central Railway 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.