दीपक गायकवाड याने साडे तीन हजार लोकांना गंडा घातल्याची प्राथमिक माहिती
By मुरलीधर भवार | Published: January 6, 2024 04:09 PM2024-01-06T16:09:02+5:302024-01-06T16:10:25+5:30
जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा नागरीकांचा आरोप
कल्याण-पत्नी आणि मुलांची हत्या करणाऱ्या दीपक गायकवाड याने चार जवळपास ४०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची तक्रार फसवणूक झालेल्या नागरीकांनी पोलिसांकडे केली आहे. फसवणूक झालेल्या नागरीकांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती घेटे यानी नागरिकांना दिली आहे.
काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या खेळणी विक्री व्यावसायिक दीपक याने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केली. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दीपक गायकवाड याला अटक केली. दीपक याच्या वरिोधात अटकेची कारवाई केल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी दीपक याच्यासह त्याच्या साथीदार आणि कुटंबियांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात दीपक वगळता अन्य कोणावरही कारवाई झालेली नाही. कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. या दरम्यान शनिवारी सकाळी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली.
यावेळी प्रत्येक नागरिकांनी त्यांची व्यथा घेटे यांच्याकडे मांडली. अरविंद माेरे यांनी सांगितले की, दीपक याने विविध कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. जवळपास ३ हजार ५०० लोकांनी गायकवाड यांच्याकडे पैसे गुंतविले होते. जास्तीचा परतावा देण्याच्या नावाखाली दीपक गायकवाड याने नागरिकांना फसविले आहे. यावेळी घेटे यांनी सांगितले की, या प्रकरणात गुन्हा दाखल होणार आहे. पुढील कारवााईही होणार आहे. नागरीकांनी जास्तीचे पैसे कमाविण्याच्या आमिषापोटी पैसे दिले होते. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता गुंतवणूक केली आहे. दीपक काय करतो याची माहिती नागरिकांनी घ्यायला पाहिजे होती. पैसे गुंतविले हे मान्य आहे. त्याचा तपास ही केला जाणार आहे. परंतु नागरीकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.