रस्ते निहाय स्वच्छतेचा कृती आराखडा तयार करा, केडीएमसी आयुक्तांचे आदेश
By मुरलीधर भवार | Published: October 21, 2023 06:14 PM2023-10-21T18:14:13+5:302023-10-21T18:14:30+5:30
जमीन मालक आणि बिल्डर यांच्या मोकळ्या तसेच खाजगी जागांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे.
कल्याण-रस्त्यालगत आणि माेकळ्या जागेवर पडणारा कचरा आणि रस्त्यावरील धूळ दूर करण्याकरीता साफसपाई आणि स्वच्छतेचा रस्ते निहाय कृती आराखडा तयार करण्यात यावा असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांना दिले आहेत.
महापालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसर, ९० फुटी रोड, आग्रा रोड, घरडा सर्कल तसेच अन्य वर्दळीच्या ठिकाणी, अंतर्गत रस्त्यांवर पडलेली माती आणि खडीसह धुळीचे प्रमाण जास्त असल्याचे पाहणी दरम्यान आयुक्तांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांना आणि शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना श्वसनाचे विकार जाणवत असल्याच्या तक्रारी येत आहेत. याची आयुक्तांनी तातडीने दखल घेतली आहे. त्यावर उपाययोजना करण्याकरीता वर्दळीच्या ठिकाणासह शहरातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्त्यांची पाहणी करुन स्वच्छतेचे नियोजन करावे. त्यासाठी रस्ते निहाय कृती आराखडा तयार करुन तो सादर करण्यात यावा. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरु करण्यात यावी असे आदेश आयुक्तांनी उपायुक्तांना दिले आहेत.
जमीन मालक आणि बिल्डर यांच्या मोकळ्या तसेच खाजगी जागांवर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. संबंधितांशी संपर्क साधून सदर कचरा उचलून घेण्याबाबत त्यांना सूचना द्याव्यात आणि त्यांनी सूचनाचे पालन न केल्यास त्यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त यांनी दंडात्मक कारवाई करावी. महापालिका हद्दीत सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणांपासून मालवाहू वाहनातून रस्त्यावर खडी आणि माती पडल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून त्यावर दुचाकी घसरून अपघात होण्याचा संभव असल्याने यावर नियंत्रण आणणेकामी महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार संबंधितावर संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही संबंधित विभागाने करावी. शहर अभियंता यांनी त्यांचे अधिनस्त विभागामार्फत सुरू असलेल्या स्थापत्य कामकाजाच्या ठिकाणी रस्त्यालगत निर्माण होणारा राडारोडा तात्काळ उचलून घेणे बाबत संबंधित अभियंता आणि ठेकेदारास आदेश द्यावेत असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.