पाणी टंचाईच्या विरोधात केडीएमसीच्या 'अ' प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा
By मुरलीधर भवार | Updated: December 17, 2024 17:39 IST2024-12-17T17:39:19+5:302024-12-17T17:39:33+5:30
महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.

पाणी टंचाईच्या विरोधात केडीएमसीच्या 'अ' प्रभाग कार्यालयावर धडक मोर्चा
कल्याण : टिटवाळा मांडा परिसरातील नागरीक पाणी टंचाईने हैराण आहे. त्यांच्या पाण्याची समस्या सोडविली जात नसल्याने संतप्त झालेला महिलांनी भाजपच्या माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका उपेक्षा भोईर यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अ प्रभाग कार्यालयावर धडक हंडा कळशी मोर्चा काढला. यावेळी महिला बैलगाडीतून प्रभाग कार्यालयात आल्या होत्या. महापालिका प्रशासनाच्या विरेधात महिलांनी जोरदार घोषणाबाजीकरीत उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांना पदावरुन तात्काळ हटविण्याची मागणी केली.
माजी उपमहापौर आणि माजी नगरसेविका भोईर यांच्या नेतृत्वाखाली टिटवाळा येथून काढण्यात आलेल्या मोर्चात भाजप पदाधिकारी शक्तीवान भोईर, रुपेश भोईर, दीपक कांबळे, किरण रोटे, सारीका पाटील, गजानन मढवी यांच्यासह असंख्य महिला पुरुष आणि लहान मुले या हंडा कळशी मोर्चात सहभागी झाले होते. माजी उपमहापौर भोईर यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षापासून टिटवाळा मांडा परिसरात पाण्याची समस्या आहे. यापूर्वीही पाणी समस्या दूर करण्याच्या मागणीकरीता धडक मोर्चा काढला आहे. आत्ता या भागातील पाणी खात्यातील उपअभियंता अनिरुद्ध सराफ हे नागरीकांच्या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. त्याला योग्य ते उत्तर देत नाही.
महापालिका हद्दीतील मांडा टिटवाळा परिसरातील नागरीक महापालिकेस पाणी आणि मालमत्ता कर भरतात. तरी देखील महापालिकेकडून पाणी पुरवठा आणि अन्य नागरी सोयी सुविधा नागरीकांना पुरविल्या जात नाही. टिटवाळा परिसरातील नागरीकांना महापालिका प्रशासनाकडून भेदभावाची वागणूक दिली जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने प्रशासनाला जाब विचारण्याकरीता नगरसेवकांचे सदस्य मंडळ नाही. त्यामुळे प्रशासन निर्ढावलेले आहे. नागरीकांची पाणी समस्या सोडविली नाही. तर यापेक्षा भव्य मोर्चा महापालिकेच्या मुख्यालयावर काढला जाईल असा इशारा भोईर यांनी प्रशासनाला दिला.
या वेळी मोर्चाला पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता अशोक घोडे हे सामोरे गेले. त्यांनी मार्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. त्याचबरोबर टिटवाळा मांडा पश्चिमेतील रेल्वे मार्गाच्या खालून जलवाहिनी टाकण्याचे काम येत्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाईल. त्याचबरोबर जलकुंभ उभारण्याचे काम येत्या मार्च अखेरपर्यंत पूर्ण केले जाईल. ही दोन कामे मार्गी लावल्यानंतर पाणी समस्या सूटण्यास मदत होणार आहे. त्याचबोबर येत्या आठ दिवसात टिटवाळा मांडा परिसरातील बेकायदा नळ जाेडण्या ताेडण्याची कारवाई केली जाणार आहे. टिटवाळा मांडा परिसरात बेकायदा बांधकामे असल्याचे घाेडे यांनी मान्य करीत त्यामळेच पाणी टंचाईची समस्या उद्धवली असल्याचे स्पष्ट केले.