उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ तास नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन

By मुरलीधर भवार | Published: August 29, 2024 03:34 PM2024-08-29T15:34:38+5:302024-08-29T15:35:35+5:30

नितीन निकम यांनी आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तासात नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.

Protest by standing in river water for 12 hours to prevent pollution of river Ulhas | उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ तास नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन

उल्हास नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी १२ तास नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन

कल्याण - काेट्यवधी जनतेची तहान भागविणाऱ्या उल्हास नदीच्या प्रदूषणाकडे सरकारी यंत्रणांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक नितीन निकम यांनी आज सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे १२ तासात नदीपात्रातील पाण्यात उभे राहून आंदोलन केले.

निकम यांच्या आंदोलनास माजी नगरसेवक कैलास शिंदे, उमेश बाेरगावकर यांनी पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर निकम यांची आंदोलनस्थळी जाऊन शिंदे सेनेचे माजी नगरसेवक निलेश शिंदे आणि महेश गायकवाड यांनी भेट घेतली.

उल्हास नदी ही बारमाही नदी आहे. या नदीतून विविध सरकारी संस्था पाणी उचलतात. या नदीत रासायनिक सांडपाणी आणि घरगूती सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी विविध सामाजिक संस्थांसह मी कल्याणकर संस्था कार्यरत आहे. गेल्या दहा वर्षापासून निकम हे सरकारी यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहे. यापूर्वही नदी पात्रात निकम यांनी दिवसरात्र अनेक दिवस आंदोलन केले आहे.

नदीचे प्रदूषण रोखण्याकरीता त्यांनी विविध सरकारी संस्थांकडे पाठपुरावा करुन देखील प्रदूषण रोखले जात नाही. निकम यांच्या आंदोलनाची दखल यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंती पाटील यांच्यासह आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यावेळी पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री होते. नदी प्रदूषण रोखण्याचे आदेश सरकारी यंत्रणाना दिले होते. त्यांच्या आदेशापश्चातही येरे माझ्या मागल्या अशीच स्थिती आहे. त्यामुळे आज निकम यांनी पुन्हा नदी पात्रातील पाण्यात १२ तास उभे राहून आंदोलन करीत सरकारी यंत्रणांचे लक्ष वेधले आहे.

निकम यांनी सांगितले की, २०२१ साली नदी पात्रात आंदोलन केले. त्यावेळी महापालिकेने नदी पात्रात येऊन मिळणारे सांडपाण्याचे नाले वळविण्याचे आश्वासन दिले होते. हे काम ३१ मे २०२१ पर्यंत मार्गी लावले जाईल असे म्हटले होते. त्या पश्चातही महापालिका हद्दीतील गाळेगाव आणि माेहने येथील सांडपाण्याचा नाला थेट नदी पात्रात येऊन मिळतो. सांडपाणी आणि मलमूत्र थेट नदीपात्रात मिसळत आहे. त्यामुळे नदी पात्रात दरवर्षी जलपर्णीची समस्या उद्भवते. या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबीत करण्यात यावे. नाले तातडीनने वळविले जावेत. नदीचे प्रदूषण रोखण्याची उपाययोजना तातडीने करावी या मागणीकडे निकम यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे.

Web Title: Protest by standing in river water for 12 hours to prevent pollution of river Ulhas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण