दहा पट मालमत्ता कर वसुलीविरोधात २७ गाव संघर्ष समितीचे धरणे आंदोलन
By मुरलीधर भवार | Published: April 20, 2023 03:38 PM2023-04-20T15:38:30+5:302023-04-20T15:40:51+5:30
२७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी आज सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावातील नागरीकांना दहा पट मालमत्ता कर आकारला जात आहे. हा कर नागरीकांना भरणे अशक्य असल्याने ताे रद्द करण्यात यावा. २७ गावे महापालिकेतून वगळल्यास कराचा हा प्रश्न संपुष्टात येईल या मागणीसाठी आज सर्व पक्षीय संघर्ष समितीच्या वतीने सुभाष मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
या धरणे आंदोलनात समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार आणि उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, रंगनाथ ठाकूर, अरुण वायले, गजानन मांगरुळकर, विजय भाने, तुळशीराम म्हात्रे, वासूदेव गायकर, कुंदा मढवी आदी सहभागी झाले होते. समितीच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेतली. २७ गावे महापलिकेत समाविष्ट केली. त्यानंतर २०१७ पर्यंत ग्रामपंचायतीप्रमाणे कर वसूल केला गेला. त्यानंतर थेट दहा पट मालमत्ता कराची आकारणी ही जाचक आहे. २७ गावातील शाळा आणि आरोग्य केंद्र हे आजही जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. २७ गावांची स्वतंत्र नगर पालिका करण्यात येणार होती म्हणून कल्याण ग्रोथ सेंटर तयार केले जाणार होते.
राज्य सरकारकडून २७ गावे वेगळी करण्याचा निर्णयच घेतला जात नसल्याने कल्याण ग्रोथ सेंटर ही आम्हाला नको. त्यासाठी कल्याण ग्रोथ सेंटरला समितीचा विरोध आहे. या धरणे आंदोलनास शिंदे गटाचे युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी भेट दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने धरणे आंदोलन करणाऱ्यांना एकच सांगतो की, २७ गावांच्या दहा पट मालमत्ता करा विषयी लवकर प्रशासन पातळीवर बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले.
याचबरोबर या धऱणे आंदोलनास ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी ही भेट देऊन २७ गावांच्या मागण्यांना जाहिर पाठिंबा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगतात की, ते सामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. तर त्यांनी २७ गावच्या सामान्यांचा प्रश्न मार्गी लावावा. २७ गावांची स्वतंत्र नगररपालिका करण्याची घाेषणा करावी.