डोंबिवलीत स्थानिक मासेविक्रेत्या महिलांचे आंदोलन ; बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांना बंदी घालण्याची मागणी
By प्रशांत माने | Published: November 3, 2023 10:58 AM2023-11-03T10:58:46+5:302023-11-03T11:00:39+5:30
व्यवसाय बंद ठेवून केला निषेध.
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: बाहेरून येणाऱ्या मच्छी विक्रेत्यांविरोधात डोंबिवली पश्चिमेतील स्थानिक महिला मासे विक्रेत्या आक्रमक झाल्या असून आज या मच्छी विक्रेत्यांनी बंद पाळत आपला रोष व्यक्त केला आहे.
डोंबिवली पश्चिमेतील उमेश नगर परिसरात भरणारा किरकोळ मासळी बाजार भरतो. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी स्थानिक भूमीपुत्र समाज बांधव मासे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वसई आणि आसपासच्या परिसरातील स्थानिक मासे विक्रेते डोंबिवलीमध्ये येऊन व्यवसाय करत असल्याने आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया या आंदोलनकर्त्या महिलांनी दिली.
तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी डोंबिवलीतील भूमीपुत्र महिलांना सहकार्य करण्याऐवजी वसईहून येणाऱ्या मासे विक्रेत्यांना सहकार्य करत असल्याबद्दलही डोंबिवलीतील मासे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच आमच्या मागणीची दखल न घेतल्यास आणखी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी महिला मासे विक्रेत्यांच्या संघटनेतर्फे देण्यात आला आहे. दरम्यान या बंद आंदोलनामुळे आज माशांवर ताव मारण्याचा बेत आखणाऱ्या खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे.