संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी भरीव निधी देणार; आगरी महोत्सवात खा.श्रीकांत शिंदे यांची घोषणा
By मुरलीधर भवार | Published: December 18, 2023 03:14 PM2023-12-18T15:14:49+5:302023-12-18T15:18:13+5:30
भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील सर्वात उंच असलेल्या नेतिवली टेकडीवर संत सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल.
मुरलीधर भवार,डोंबिवली : भविष्यात अनेक पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीतील सर्वात उंच असलेल्या नेतिवली टेकडीवर संत सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल. या स्मारकासाठी सरकारकडून भरीव निधीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रविवारी येथे दिले. आगरी समाजासह भूमिपूत्रांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार संवेदनशील आहे, अशी ग्वाही डॉ. शिंदे यांनी दिले.
डोंबिवलीत सुरू असलेल्या १९ व्या अखिल भारतीय आगरी महोत्सवात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने `महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रम प्रायोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने खासदार शिंदे यांनी काल सदिच्छा भेट देऊन उपस्थित हजारो नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ठाण्याचे माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांध्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
दहा एकर जागेत संत सावळाराम महाराजांचे प्रेरणादायी स्मारक, २७ गावांवर लादलेला वाढीव कर रद्द करावा, शीळफाटा ते कल्याण रस्त्याला संत सावळाराम महाराजांचे नाव द्यावे, स्थानिक भूमिपूत्रांची मुले शिक्षण घेत असलेल्या आगरी युथ फोरमच्या महाविद्यालयाला जागा द्यावी आदी मागण्या आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, सल्लागार विजय पाटील, कार्याध्यक्ष जालिंदर पाटील, सरचिटणीस रामकृष्ण पाटील, खजिनदार पांडुरंग म्हात्रे आणि कार्यकारी सदस्य शरद पाटील यांच्या नेतृत्वाखील फोरमच्या सदस्यांनी केल्या. श्री खिडकाळेश्वर मंदिर परिसराचे सुशोभिकरण व बेतवडे येथील वारकरी भवनची कामे वेगाने सुरू असल्याबद्दल आभार मानण्यात आले. त्याला उत्तर देताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आगरी समाजासह सर्व भूमिपूत्रांच्या मागण्या सोडविण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असल्याचे नमूद केले.
आगरी महोत्सव हा आगरी समाजाबरोबरच इतर सर्व समाजांना बरोबर घेऊन वाटचाल करणारा डोंबिवलीतील मोठा महोत्सव आहे. या महोत्सवातील दर्जेदार कार्यक्रमांमुळे सांस्कृतिक परंपरा असलेल्या डोंबिवलीतील नागरिकांबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांची पसंती मिळत आहे. कल्याण-डोंबिवली शहराच्या विकासात आगरी बांधवांचे योगदान मोठे आहे, याबद्दल डॉ. शिंदे यांनी कौतुक केले.
आगरी समाजाच्या आस्था व श्रद्धेचा विषय असलेल्या संत सावळाराम महाराजांच्या भव्य स्मारकासाठी नेतिवली येथील जागा निश्चित झाली आहे. या जागेवरील आरक्षण बदलाचे काम सुरू आहे. त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर स्मारकासाठी सरकारकडून भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही खासदार शिंदे यांनी दिली. शीळफाटा ते कल्याण रस्त्यावर संत सावळाराम महाराजांच्या नावाचे भव्य गेट उभारण्याबरोबरच रस्त्याला महाराजांचे नाव दिले जाईल. २७ गावांतील भूमिपूत्रांच्या कर रद्द करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करू, अशी ग्वाही खासदार शिंदे यांनी दिली.