महाविद्यालयीन, शालेय प्राचार्य, शिक्षक यांच्या माध्यमातून मतदानाविषयी जनजागृती
By अनिकेत घमंडी | Published: April 13, 2024 06:37 PM2024-04-13T18:37:17+5:302024-04-13T18:37:49+5:30
कल्याण पूर्व परिसरात निवडणूक विभागाचा उपक्रम
डोंबिवली: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २४ कल्याण लोकसभा मतदार संघातील , १४२कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात , मतदार जनजागृतीसाठी स्विप पथकातील मतदार जनजागृती पथक महापालिकेचे शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी विजय सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या मतदान जनजागृतीपर बैठकीचे आयोजन नूतन ज्ञान मंदिर शाळा येथे करण्यात आले होते.
त्या कार्यक्रमात उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापक यांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच त्यांनी आपल्या शाळा व महाविद्यालयातील शिक्षकांना मतदान जनजागृती पर कार्यक्रम करण्याबाबत प्रोत्साहित करावे त्याचप्रमाणे आपल्या शाळा व महाविद्यालयात चुनाव की पाठशाळा या विषयावर पालकांची बैठक आयोजित करावी आणि इतर मतदान जनजागृती पर कार्यक्रम करावेत अशा सूचना देण्यात आल्या.
ध्वनिक्षेपकाद्वारे मतदान जनजागृतीपर गीत वाजवून उपस्थितांना मोठ्या प्रमाणात मतदान करणे बाबत आवाहन करण्यात आले आणि सर्व शाळा व महाविद्यालयातील प्राचार्य/ मुख्याध्यापक व शिक्षक यांचे समवेत मतदान जनजागृती शपथ घेण्यात आली. या जनजागृती कार्यक्रमास शाळा व महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि प्राचार्य यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून चांगला प्रतिसाद दिला. त्यावेळी स्विप पथकातील प्रणव देसाई ,समाधान मोरे, विलास नंदनवार ,सर्जेश वेलेकर भारती दगळे व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.