मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून सर्व स्तरावरुन जनजागृती
By अनिकेत घमंडी | Published: April 16, 2024 05:48 PM2024-04-16T17:48:02+5:302024-04-16T17:49:21+5:30
कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी त्यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
अनिकेत घमंडी, डोंबिवली: मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे प्रयत्नशील असून स्वीप ॲक्टीवीटींच्या (सिस्टिमॅटिक व्होटर एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टीसिपेटंट) माध्यमातून सर्व स्तरावरुन जनजागृती केली जात आहे, अशी माहिती २४ कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी त्यांच्या कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार निवडणूकीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी प्रसिद्ध होईल व त्यानुसार निवडणूकीचा कार्यक्रम राहिल अशी माहिती या लोकसभेच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी २४-कल्याण लोकसभा मतदार संघा अंतर्गत प्रत्येक (एकुण ६) विधानसभा मतदार संघात उपलब्धततेनुसार 1 दिव्यांग संचलित मतदान केंद्र, १ महिला संचलित मतदान केंद्र आणि युवा मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी १युवा कर्मचारी यांचेद्वारे संचलित मतदान केंद्र मतदानाचे दिवशी कार्यरत राहील. निवडणूकीच्या कर्तव्यावर असलेल्या ज्या कर्मचा-यांचे मतदान २० मे रोजी आहे व निवडणूकीच्या दिवशी २४-कल्याण लोकसभा मतदार संघात कर्तव्यावर असून इतर लोकसभा मतदार संघात त्यांचे नाव आहे, अशा ५०९ कर्मचा-यांनी टपाली मतपत्रिकेसाठी तर ज्यांचे नाव याच लोकसभा मतदार संघात आहे, अशा ६५५ कर्मचा-यांनी निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी अर्ज केले आहेत,त्यांना पुढील आदेश देतेवेळी टपाली/निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी सुविधा पुरविण्यात येणार आहे. पोलीस कर्मचारी/अधिकारी यांनी देखील पिबी साठी अर्ज केलेले आहेत.
खर्चाची दरसूची जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली असून, सदर दरसूची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना काल वितरीत करण्यात आली आहे, निवडणूकीपूर्वी, प्रचार कालावधी संपुष्टात आल्यानंतर राजकीय/निवडणूकीची जाहिरात द्यावयाची झाल्यास संबंधित उमेदवार वा त्याच्या प्रतिनिधीने माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल, तसेच १७ एप्रिलपासून ओपिनियन पोल/ सर्व्हे प्रसिध्द करणे व ०१जून रोजी सायं.६:३० पर्यंत एक्झिट पोल बाबत माहिती प्रसिध्द करण्यावर बंदी आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतर प्रचारासाठी आलेल्या तथापि मतदार संघातील मतदार नसलेल्या नागरीकांनी या मतदार संघातून प्रस्थान करावयाचे आहे, अशी माहिती सातपुते यांनी दिली.