एक लाख ग्रंथसंपदा असलेले कल्याणचे सार्वजनिक वाचनालय
By मुरलीधर भवार | Published: January 23, 2023 06:12 AM2023-01-23T06:12:23+5:302023-01-23T06:12:31+5:30
कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाची १८५४ साली सदाशिव साठे यांनी स्थापना केली.
कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाची १८५४ साली सदाशिव साठे यांनी स्थापना केली. एक लाख ग्रंथसंपदा असलेले हे वाचनालय १६० वर्षांपासून ज्ञानाची भूक भागविण्याचे काम अविरत करत आहे. या वाचनालयाची शतकोत्तर हीरकमहोत्सवी वाटचाल सुरू आहे.
साठे यांनी या वाचनालयाची सुरुवात त्यांच्या घरातून केली होती. तेव्हा त्याला ‘नेटिव्ह लायब्ररी’ म्हणून संबोधले जात होते. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून या लायब्ररीचे नाव ‘सार्वजनिक वाचनालय’ असे ठेवण्यात आले. सुरुवातीला ४० पुस्तकांपासून सुरू करण्यात आलेल्या या वाचनालयाची ग्रंथसंपदा एक लाखांच्या घरात पोहोचली आहे. आजही वाचकांकडून महिन्याला अवघे ३५ रुपये इतके अल्प शुल्क आकारले जाते. ‘अ’ वर्ग तालुका दर्जा सरकारकडून या वाचनालयाला मिळाला आहे. अनेक पुरस्कारही या वाचनालयाला मिळाले आहेत. या वाचनालयाला कविवर्य कुसुमाग्रज, ज्येष्ठ साहित्यिका वीणा देव, शं. ना. नवरे आदी साहित्यिकांनी भेट दिली आहे. वाचनालय पूर्णपणे संगणकीकृत करण्यात आले आहे. वाचकांसाठी मोबाइल ॲप आहे. वाचनालयाची वेबसाइट आहे. आजमितीस तीन हजार ५०० सभासद आहेत. जे दररोज विविध पुस्तकांच्या वाचनाचा आनंद घेतात.
अभ्यासाकरिता दुर्मीळ ग्रंथ उपलब्ध करून दिले जातात. वाचनालयातर्फे वाचकांसाठी पु. भा. भावे व्याख्यानमाला आयोजित केली जाते. वाचक प्रेरणा दिन, ग्रंथ दिन साजरा केला जातो. दि. बा. मोकाशी यांच्या नावाने ‘कथा पुरस्कार’ दिला जातो.
तीन शाखा, अभ्यासिका कार्यरत
वाचनालयाच्या तीन शाखा आहेत. त्यापैकी दोन मराठी आणि एक हिंदी, इंग्रजी पुस्तकांची आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका चालविली जाते. वाचनालयाच्या ग्रंथ प्रचार व प्रसार उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, राजन खान, श्रीपाल सबनीस, प्रवीण दवणे आदी साहित्यिकांना पाचारण करण्यात आले आहे.
कार्यकारिणी
अध्यक्ष :
मिलिंद कुलकर्णी
सरचिटणीस : भिकू बारस्कर
ग्रंथपाल : गौरी देवळे
सहग्रंथपाल : करुणा कल्याणकर
पदाधिकारी : प्रशांत मुल्हेरकर, सुरेश पटवर्धन, आशा जोशी, माधव डोळे, दिलीप कर्डेकर, अरुण देशपांडे, सीमा गोखले, श्रीधर घारपुरे, नीलिमा नरेगलकर, जितेंद्र भामरे, अमिता कुकडे, सुहास चौधरी, परिघा विधाते, अरविंद शिंपी