उल्हासनगरात मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई
By सदानंद नाईक | Published: January 25, 2024 06:22 PM2024-01-25T18:22:22+5:302024-01-25T18:23:00+5:30
दंड न भरणारे दुकान होणार सील
उल्हासनगर : महापालिकेच्या नोटीसीनंतरही दुकानदार मराठी पाट्या लावत नसल्याने, आज दुकांदारावर दंडात्मक कारवाई सुरू केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. तसेच दंडात्मक रक्कम न भरणाऱ्या दुकाने सिल करण्यात येणार असल्याचे संकेत लेंगरेकर यांनी दिले आहे.
उल्हासनगर महापालिकेने शासनाच्या आदेशानुसार दुकानदारांसह इतर आस्थापनाना मराठी भाषेत ठळक अक्षरात पाट्या लावण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यानंतरही मराठी पाट्या लावल्या जात नसल्याने, महापालिकेने दुकांदारासह इतर शासकीय व बिगर शासकीय आस्थापनाना मराठी पाट्या लावण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या. तसेच व्यापारी संघटना व व्यापाऱ्यांत बैठका घेऊन जनजागृती केली होती. मात्र दुकानदारानी सहकार्य केले नसल्याने, अखेर महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यासह महापालिका अधिकारी रस्त्यावर उतरून त्यांनी मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकांदारावर गुरवारी पासून दंडात्मक कारवाई सुरू केली. आयुक्त अजीज शेख यांनीही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत दिल्याने, दुकानदारासह इतर आस्थापनात खळबळ उडाली आहे.
महापालिका आयुक्त अजिज शेख यांच्या आदेशाने, मराठी पाट्या न लावणाऱ्या विरोधात अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त अशोक नाईकवडे, प्रभारी प्रभाग अधिकारी दत्तात्रय जाधव, जेठानंद व अनिल खतुरानी आणि बाजार व परवाना विभागाचे विभाग प्रमुख विनोद केणे यांनी शहरात मराठी फलक न लावलेल्या दुकानदारांवर कारवाई सुरू केली. जो कोणी शासनाच्या अधिनियमाच्या तरतुदींचे किंवा त्याखाली करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करणार, त्याच्यावर एक लाख रुपयांपर्यंत दंडासह शिक्षा होण्याचे संकेत महापालिका अधिकाऱ्यांनी दिले. तसेच पाट्या न लावणाऱ्या नियमांचे उल्लंघन करणे सुरू ठेवले. त्याला प्रत्येक दिवसासाठी २ हजार रुपयांपर्यंत वाढीव दंड व शिक्षा होण्याची शिक्षाही होऊ शकते. असे संकेत महापालिकेने दिले आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ३१३ अन्वये कारखाने व धंदे इत्यादीसाठी व कलम ३७२ ते ३८६ मधील तरतुदीनुसार परवाना फी घेवून परवाना घेणे आवश्यक असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांनी दिली आहे.