अमेझॉन ऑनलाईन खरेदी केला मोबाईल, ग्राहकाला आला केवळ रिकामा बॉक्स
By मुरलीधर भवार | Published: October 28, 2023 03:24 PM2023-10-28T15:24:39+5:302023-10-28T15:26:01+5:30
नाईक या आजदे गावातील समर्थ मंगल इमारतीत राहतात. त्यांनी अमेझॉन कंपनीकडून ऑनलाईनद्वारे ३३ जार ९९९ रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता.
डोंबिवली-आजदे गावात राहणाऱ््या सुवर्णा नाईक यांनी अमेझॉन कंपनी कडून ऑनलाईनद्वारे मोबाईल खरेदी केला होता. त्याच्याघरी मोबाईलचे पार्सल कंपनीकडून पाठविले गेले. मात्र त्या पार्सल बॉक्समध्ये मोबाईल नव्हता. तर केवळ मोबाईलचा रिकामा बॉक्स होता. हे पाहून नाईक यांना धक्काच बसला. त्यांनी या प्रकरणी अमेझॉन कंपनीकडे तक्रार केली आहे.
नाईक या आजदे गावातील समर्थ मंगल इमारतीत राहतात. त्यांनी अमेझॉन कंपनीकडून ऑनलाईनद्वारे ३३ जार ९९९ रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल खरेदी केला. त्यांनी खरेदी केलेल्या मोबाईलची डिलिव्हरी त्यांना मिळाली. त्यांना कंपनीकडून आलेला पार्सल बॉक्स उघडून पाहिला. त्या बॉक्समध्ये मोबाईल नव्हता. रिकामा बॉक्स होता.
नाईक यांनी या प्रकरणी अमेझॉन कंपनीकडे ईमेल आणि कॉल सेंटरवर फोन करुन तक्रार दाखल केली. त्यानंतर अमेझॉन कंपनीने याबाबतीत चौकशी करण्यासाठी नाईक यांच्याकडून वेळ मागून घेतला. ही वेळही संपली. त्यानंतर नाईक यांनी पुन्हा कंपनीकडे विचारणा केली असता कंपनीने हात वरती केले आहेत. कंपनीने सांगितले यात आमची चूक नाही. तसेच नाईक यांनी भरलेली रक्कमही परत मिळणार नाही असे सांगितले. तुम्हाला काय करायचे ते करा असे उत्तर दिले आहे.
नाईक या पोळी भाजी करण्याचे काम करतात. रोज सकाळी उठून त्या कामावर जातात. काम आटोपून त्या सायंकाळी घरी परतात. त्याच्या मुलाने आईला भेट देण्यासाठी हा मोबाईल मागविला होता. नाईक यांच्या घरी दिवसभर कोणी नसते. त्यामुळे मोबाईल मागविता त्यांनी शेजारी राहणारे प्रमोद शिंदे यांचा नाव पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन हा मोबाईल मागविला होता. या प्रकरणी पुन्हा ई मेलद्वारे कंपनीला तक्रार करण्यात आली आहे. त्याचे उत्तर कंपनीकडून अद्याप मिळालेले नाही. कंपनीकडून उत्तर मिळाले नाही तर या प्रकरणी नाईक या पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहेत.