मराठीत पाट्या लावा अन्यथा...; मनसेनं दिला 'असा' अल्टीमेटम!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 08:33 PM2022-01-20T20:33:32+5:302022-01-20T20:38:18+5:30
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून याअगोदरही मनसेने रस्त्यावर उतरत आंदोलने केली आहेत.
कल्याण - मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरुन आता राजकारण जबरदस्त तापू लागले आहे. यातच कल्याण-डोंबिवली ही शहरं राजकारण्यांसाठी हॉट डेस्टिनेशन झाली आहेत. कल्याणात अमराठी व्यापाऱ्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र डोंबिवलीत अनेक व्यापाऱ्यांना मराठीचे वावडे असल्याचा मुद्दा लोकमतने मांडला होता. यावर आता मनसेनेसुद्धा प्रतिक्रिया देत व्यापाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन आहे. त्याअगोदर दुकानांच्या पाट्या मराठीत लागल्या नाही, तर मनसे स्टाईलने खलखट्याक करू, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.
मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून याअगोदरही मनसेने रस्त्यावर उतरत आंदोलने केली आहेत. मराठीचा मुद्दा कल्याण डोंबिवली मनसेने चांगलाच उचलून धरला होता. मराठमोळ्या डोंबिवली शहरात अनेकभाषिक लोक राहतात. सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली नगरीत आजही मराठी सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. मात्र माध्यतरी एका बिल्डिंगला गुजराती भाषेतून देण्यात आलेले नाव, तसेच एका राजकीय पक्षाकडून विशिष्ट भाषिकांसाठी क्रिकेट सामने आयोजित केल्याची घोषणा यामुळे मराठीच्या मुद्द्याने डोके वर काढले होते. आता पुन्हा मनसेने मराठी पाट्यांसाठी अलटीमेंटम दिला असून शिवसेना पक्ष मात्र यावर काय भूमिका घेतो ते पाहावे लागणार आहे.
राज्य सरकारला उशिरा का होईना जाग आली. 27 फेब्रुवारीच्या आत मराठीत मोठ्या अक्षराने दुकानांवर मराठी पाटी लागली नाही, तर रस्त्यावर उतरावे लागेल, असे डोंबिवलीचे मनसे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी म्हटले आहे.