६२ हजार ५०० पुस्तकांच्या श्रीराम मंदिरावर रवींद्र चव्हाण यांनी चढवला कळस
By अनिकेत घमंडी | Published: January 17, 2024 06:28 PM2024-01-17T18:28:12+5:302024-01-17T18:28:21+5:30
पूजनाला गर्दी
डोंबिवली: भारतातील एकमेव बहुभाषिक पुस्तक आदान प्रदान प्रदर्शन १९ ते २८ जानेवारी या कालावधीत येथील सावळाराम महाराज क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आले आहे. ६२ हजार ५०० पुस्तकांचे श्रीराम मंदिर उभारण्यात आले असून त्या पुस्तकरूपी श्रीराम मंदिरावर पवित्र कळस स्थापन करण्याचा सोहळा बुधवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. शहरात वाचन संस्कृती आणि धर्म संस्कृती एकत्रपणे गुण्या गोविंदाने नांदते.
या वर्षी श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत होत असताना पुस्तके हेच दैवत असणाऱ्या अनेक वाचकांना भावेल असे पुस्तकरूपी मंदिर बांधण्याची संकल्पना चव्हाण यांच्यासमोर प्रथम पै फ्रेंड्स लायब्ररीचे संचालक पुंडलिक पै यांनी मांडली, चव्हाण यांनी लगेचच होकार देत यथाशक्ती सहकार्य केले, त्यामुळे त्यांच्याच हस्ते कळस स्थापना पूजनाने कार्यारंभ करण्यात आल्याचे पै म्हणाले. त्या मंदिराकरिता ६२,५०० पुस्तकं रचून मंदिराची प्रतिकृती उभारण्यात आले. मंदिर संपूर्ण उभं करायला ३० दिवस लागले असून मंदिर ५० फूट उंच ८० फूट रुंद ४० फूट लांबी आहे. बहुभाषिक सोहळा रसिक वाचकांना खुला आहे. त्यावेळी पुंडलिक पै, विंदा भुस्कुटे, रोहिणी लोकरे, दीपाली काळे, ललिता छेडा, रागिणी उपासनी, हेमंत नेहते, अरविंद भिडे आदी उपस्थित होते.
सरस्वतीच्या उत्सवाला श्रीरामाचे अधिष्ठान मिळण्याचे सौभाग्य यंदा प्राप्त झाले आहे. प्रदर्शनस्थळावर ६२ हजार ५०० पुस्तकांचे श्रीराम मंदिर उभारण्यात आले आहे, मला याचा दरवर्षीप्रमाणे प्रमुख आयोजकाचा मान मिळाला हे माझे भाग्यच आहे, याद्वारे सरस्वतीची सेवा करता येते : रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री