डोंबिवली, ठाकुर्ली रेल्वेस्थानक गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत; फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2022 08:23 PM2022-04-21T20:23:38+5:302022-04-21T20:10:44+5:30
डोंबिवली पूर्वेला राथ रस्त्यावर तसेच पश्चिमेलाही मुंबई व कल्याण दिशेकडे तसेच मधल्या पादचारी पुलांचे प्रवेशद्वार आहेत.
डोंबिवली : पूर्वेला डॉ. राथ रोडवर डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलांच्या प्रवेशद्वारांपाशी रस्त्यावर दुचाकी, रिक्षा यांचे बेकायदा पार्किंग केले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना स्थानक गाठण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. मात्र, या पार्किंगकडे हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक नियंत्रण शाखेचे सपशेल दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. अशीच अवस्था ठाकुर्ली स्थानकाच्या पूर्वेला होत असून, तेथेही नाहक बॅरिकेड्स लावल्याने प्रवाशांना त्रास होत आहे.
डोंबिवली पूर्वेला राथ रस्त्यावर तसेच पश्चिमेलाही मुंबई व कल्याण दिशेकडे तसेच मधल्या पादचारी पुलांचे प्रवेशद्वार आहेत. या पुलांच्या जिन्यांवर जाण्यासाठी नागरिकांना दुचाकी, रिक्षा आदींच्या बेकायदा पार्किंगचा त्रास होत आहे. विशेषतः मधल्या पुलाजवळ पूर्वेला व पश्चिमेलाही रिक्षा उभ्या केल्या जात आहेत.
रेल्वेस्थानक परिसर हा अत्यंत गजबजलेला असल्याने एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिक व प्रवाशांना बाहेर पडणे कठीण होऊ शकते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील पार्किंग कायमचे बंद करावे, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.दरम्यान, ठाकुर्लीतील दक्ष नागरिक मंदार अभ्यंकर यांनी तेथील बॅरिकेड्स संदर्भात मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मंगळवारी ट्विट करून ही समस्या मांडली आहे. त्यावर त्वरित योग्य ती कार्यवाही होईल, असे आश्वासन त्यांना मिळाले आहे.
फेरीवाल्यांवर कधी होणार कारवाई?
डॉ. राथ रोडवर फेरीवाल्यांचीही संख्या वाढली आहे. त्यांचाही अडथळा ठरत आहे. त्यांच्याविरोधात केडीएमसी प्रशासन कारवाई कधी करणार? असा सवालही केला जात आहे.