मनसेच्या डोंबिवली शहरअध्यक्षपदी राहुल कामत यांची पुन्हा वर्णी; मनोज घरत दुसऱ्यांदा पदावरून दूर
By प्रशांत माने | Published: October 25, 2023 05:49 PM2023-10-25T17:49:43+5:302023-10-25T17:49:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: मनसेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले केडीएमसी शिक्षण ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: मनसेेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले केडीएमसी शिक्षण मंडळाचे माजी सदस्य राहुल कामत यांच्याकडे पक्षाच्या डोंबिवली शहरअध्यक्ष पदाची पुन्हा एकदा धूरा सोपविण्यात आली आहे. आधीचे शहरअध्यक्ष मनोज घरत यांच्याजागी त्यांची नियुक्ती केली गेली आहे.
राज ठाकरे हे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा विदयार्थी सेनेत ठाकरे यांच्यासोबत कामत होते. २००६ ला मनसे पक्षाची स्थापना झाल्यावर २००६ ते २००७ या कालावधीकरीता कामत यांनी डोंबिवली मनसेचे पहिले शहरअध्यक्ष म्हणून पद भुषविले. २००८ मध्ये त्यांनी डोंबिवली पुर्वेतील नेहरू मैदान प्रभागाचे नगरसेवक अॅड नंदकिशोर जोशी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक लढवली आहे. तर २०११ पासून कल्याण ग्रामीण, डोंबिवली जिल्हासंघटक म्हणून जबाबदारी सांभाळणा-या कामत यांच्याकडे पुन्हा एकदा डोंबिवली शहरअध्यक्षपदाची धूरा सोप आहे. बुधवारी ठाकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र दिले गेले. एक वर्षाकरीता कामत यांची नियुक्ती केली गेली आहे. त्यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील आणि ठाणे जिल्हयाचे नेते अविनाश जाधव उपस्थित होते.
...................
घरत दुस-यांदा पदावरून दूर
मनोज घरत हे पहिल्यांदा २०१५ ते २०१७ या कालावधीत शहरअध्यक्ष होते. परंतू ते विशेष छाप पाडू न शकल्याने याआधी तब्बल आठ वर्षे शहरअध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळलेल्या राजेश कदम यांच्याकडे पुन्हा हे पद दिले गेले. कदम यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये शिवसेनेची वाट धरल्यावर हे शहरअध्यक्षपद पुन्हा घरत यांच्याकडे सोपविले गेले. दरम्यान कदम यांनी त्यांच्या कार्यकाळात मनसेला नावारूपाला आणले होते. त्यांनी विविध नागरी समस्यांवर छेडलेली अनोखी आंदोलनेही चांगलीच गाजली. तशी छाप घरत यांना पाडता आली नाही अशी चर्चा आहे. आमदार राजू पाटील हे विकासकामांवरून सत्ताधा-यांवर तोंडसुख घेत असताना दुसरीकडे घरत आणि शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांचा एका हॉटेलमधील एकत्रित भोजन करीत असलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. आमदार पाटील यांच्या आवाहनानंतर २६ सप्टेंबरला कल्याण ग्रामीणमध्ये खड्डे भरो आंदोलन छेडले गेले. परंतू घरत शहरअध्यक्ष असलेल्या डोंबिवलीत आंदोलन छेडले गेले नाही. तर कल्याण ग्रामीणमधीलच मनसेच्या पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. या सर्व बाबी घरत यांना पदावरून दूर करण्यात कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे.