बनावट अमूल बटर बनविणा-या कारखान्यावर धाड; दोघांना अटक
By प्रशांत माने | Published: March 6, 2024 02:13 PM2024-03-06T14:13:29+5:302024-03-06T14:14:03+5:30
कल्याण गुन्हे अन्वेषणची कारवाई, हॉटेल, सॅन्डविच हातगाडी ढाबे व्यावसायिकांना पुरविले जायचे हे बटर
डोंबिवली: येथील काटई बदलापुर रोडवरील खोणी गावानजीक सुरू असलेल्या बनावट अमूल बटर बनविणा-या कारखान्यावर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने धाड टाकून पिंटु झीनक यादव (वय ३६) आणि प्रेमचंद फेकुराम (वय ३२) दोघेही रा. खोणीगाव या दोघा आरोपींना बेडया ठोकल्या आहेत. बनावट बटर बनविण्याकरीता लागणारे साहित्य, मशिन व इतर कच्चा माल आणि अमूल कंपनीचे कागदी बॉक्स असा सुमारे २ लाख ९३ हजार २५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दत्ताराम भोसले आणि पोलिस कॉन्स्टेबल गुरूनाथ जरग यांना मंगळवारी गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की खोणी गावातील तरंग हॉटेेलजवळील एका निर्माणधीन इमारतीत बनावट बटर बनवून तो विकला जात आहे. माहीतीवरून वरीष्ठ पोलिस निरिक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरक्षक राहुल मस्के, सहाय्यक पोलिस निरिक्षक संदीप चव्हाण, पोलिस हवालदार दत्ताराम भोसले, गुरूनाथ जरग, दिपक महाजन, बालाजी शिंदे, विश्वास माने, अमोल बोेरकर, अनुप कामत, सचिन वानखडे आदिंच्या पथकाने छापा मारून दोघा आरोपींना अटक केली. या कारवाईत ठाणे अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी राजेंद्र करडक आणि अर्चना वानरे हे देखील सहभागी झाले होते. दुपारी दोन वाजता धाड टाकण्यात आली. बुधवारी पहाटे पाच पर्यंत ही कारवाई सुरू होती.
हॉटेल, सॅन्डविच हातगाडी ढाबे व्यावसायिकांना पुरविले जायचे हे बटर
कारखान्याचा मालक पिंटु यादव हा बटर हे वनस्पती ( कमानी करूणा) रिफायनड पामोलिन ऑईल (कमानी फ्रायवेल), मीठ, अनॅटो फुड कलर यांचे मिश्रण टाकीमध्ये एकत्रित करून ते मशिनच्या सहाय्याने हलवून एकजीव करून मोल्डच्या ट्रे मध्ये आकार येण्यासाठी ठेवुन नंतर त्यातुन काढुन ते घट्ट करण्यासाठी डीप फ्रिजमध्ये ठेवत होता. आरोग्याला हानीकारक असलेल्या या बनावट बटरला अमूल कंपनीच्या नावाचे बटर पेपर लावुन नंतर ते अमुल कंपनीच्या बटर विक्रीसाठी वापरण्यात येणारे कागदी बॉक्समध्ये ते पॅक करून किरकोळ हॉटेल्स, सॅण्डविच हातगाडी व ढाबे या व्यावसायिकांना ओरीजनल अमुल बटर म्हणुन त्याचा पुरवठा केला जात होता. या दोघा आरोपींना मानपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.