पलावा उड्डाणपुलाच्या आराखड्यास रेल्वेची मंजुरी; महिनाभरात कामास प्रारंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2020 01:36 AM2020-11-29T01:36:43+5:302020-11-29T01:36:58+5:30
श्रीकांत शिंदे - भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. पलावा सर्कलजवळ देसाई खाडी ते काटई टोलनाक्यादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
कल्याण: कल्याण-शीळ रस्त्यावरील पलावा परिसरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी पलावा उड्डाणपूल उभारला जाणार आहे. या पुलाच्या सर्वसाधारण आराखड्यास रेल्वेने मंजुरी दिल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या पुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून पुलाचे काम महिनाभरात सुरू होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या सहापदरी काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. पलावा सर्कलजवळ देसाई खाडी ते काटई टोलनाक्यादरम्यान उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याच पुलाखालून रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाचे काम सुरू आहे. या रेल्वे प्रकल्पासाठी अतिरिक्त दोन मार्गिकांच्या कामासाठी जागा सोडण्याची मागणी प्रकल्पाच्या प्राधिकरणाने केली होती. त्यामुळे पलावा पुलाचा आराखडा बदलावा लागला. या पुलासाठी ४५ फाउंडेशन असून त्यापैकी ३७ चे काम पूर्ण झाले आहे. ४५ पैकी १२ पिलरचे काम पूर्ण झाले आहे. आराखडा बदलावा लागल्याने रेल्वेकडे सर्वसाधारण आराखडा पुन्हा मंजुरीसाठी पाठवावा लागला. त्याला आता मंजुरी मिळाली आहे. अंतिम आराखडाही महिनाभरात मंजूर होणार असून, त्यानंतर कामाला सुरुवात होईल, असे शिंदे म्हणाले.