रेल्वे पूल, स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी, वारांगनांचे राज्य; जीवघेणे हल्ले, छेडछाड, मोबाइल चोरी यांची मालिका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2023 12:15 PM2023-05-23T12:15:11+5:302023-05-23T12:15:17+5:30

डिसेंबर महिन्यात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकाजवळील परिसरात घडली होती

Railway Bridges, Gardullas on Skywalks, Beggars, Kingdom of Warangans; Series of fatal attacks, molestation, mobile theft | रेल्वे पूल, स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी, वारांगनांचे राज्य; जीवघेणे हल्ले, छेडछाड, मोबाइल चोरी यांची मालिका 

रेल्वे पूल, स्कायवॉकवर गर्दुल्ले, भिकारी, वारांगनांचे राज्य; जीवघेणे हल्ले, छेडछाड, मोबाइल चोरी यांची मालिका 

googlenewsNext

- प्रशांत माने
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : रेल्वेच्या पादचारी पुलावर माथेफिरूने एका तरुणीला मिठी मारल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडल्याने इथल्या सुरक्षेचा मुद्दा पु्न्हा एकदा ऐरणीवर आला. रेल्वेच्या हद्दीतील पादचारी पूल असो अथवा त्याला जोडून असलेला केडीएमसी हद्दीतील स्कायवॉक असो छेडछाड, मोबाइल चोरी, लुटमार आणि जीवघेणे हल्ले याआधीही घडले आहेत. सुरक्षेअभावी अशा घटना आजही सुरूच असताना संबंधित यंत्रणांना शहाणपण मात्र येत नाही.

डिसेंबर महिन्यात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची गळा चिरून हत्या केल्याची घटना कल्याण रेल्वे स्थानकाजवळील परिसरात घडली होती. या घटनेमुळे रेल्वे स्थानक परिसर, स्कायवॉकवर बिनदिक्कत ठाण मांडणाऱ्या भिक्षेकरी आणि गर्दुल्ले यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्याआधीही स्कायवॉकवर लुटमार आणि छेडछाडीच्या घटना घडल्या आहेत. डिसेंबर २०२० मध्ये स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणीचा गर्दुल्याने पाठलाग करत छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त झालेल्या तरुणीसह तिच्या मैत्रिणींनी आणि नागरिकांनी त्याला बेदम चोप दिला होता. छेडछाडीचा हा प्रकार घडून २४ तास उलटत नाहीत तोच स्कायवॉकवरून जाणाऱ्या तरुणाचा मोबाइल चोरून त्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. लुटमारीच्या उद्देशाने पादचाऱ्यांवर प्राणघातक हल्ले करण्याचे प्रकार घडले आहेत. 
या घटना आणि पाच महिन्यांपूर्वी घडलेल्या  हत्या आणि अत्याचाराच्या घटनेनंतरही शहर पोलिस तसेच लोहमार्ग पोलिस या परिसरावर 
लक्ष केंद्रीत करून दिवस-रात्र 
गस्त घालत नाहीत. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पोलिस यंत्रणांना काही घेणे देणे नाही, हे पुन्हा एकदा सोमवारी स्पष्ट झाले.

नागरिक असुरक्षित 
    रेल्वे स्थानक परिसरात सॅटीस प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. कल्याण कोर्ट आणि भानुसागर टॉकिजकडे उतरणारा स्कायवॉक तोडण्यात आला आहे. महालक्ष्मी, गुरूदेव हॉटेल परिसरात उतरणारा व स्थानकालगत  असलेला स्कायवॉक अस्तित्वात आहे. 
    गुरूदेव हॉटेलच्या दिशेकडील स्कायवॉकवर फिरस्ते, गुर्दुल्यांचा, वारांगनांचा उपद्रव कायम असतो. त्यामुळे प्रवासी, नागरिकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागते. सोमवारी घडलेली घटना रेल्वेच्या हद्दीतील पुलावर घडली असली, तरी यालाच जोडून असलेल्या स्कायवॉकवरचे वास्तव त्याहून भयानक आहे.  

Web Title: Railway Bridges, Gardullas on Skywalks, Beggars, Kingdom of Warangans; Series of fatal attacks, molestation, mobile theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.