विद्या पाटील यांच्या कुटुंबीयांना रेल्वेनं आर्थिक मदत करावी; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 05:44 PM2021-06-03T17:44:37+5:302021-06-03T17:46:30+5:30
विद्या पाटील यांचा एका चोरट्यामुळे रेल्वेखाली येऊन झाला होता मृत्यू. रेल्वेनं मदत करावी, अशी राजू पाटील यांची मागणी
कल्याण : ठाण्याहून घरी परतत असलेल्या महिला कर्मचारी विद्या पाटील यांचा कळवा रेल्वे स्थानकात चोरटय़ाने मोबाईल हिसकावला. या घटनेत विद्या यांचा अपघाती मृत्यू झाला. विद्या यांच्या कुटुंबीयांना रेल्वे प्रशासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. मनसेच्या वतीने स्वत: आमदार ही विद्याच्या कुटुंबियांना मदत करणार असल्याचे आमदारांनी सांगितले.
"डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखान परिसरात विद्या त्यांच्या कुटुंबीयांसोबत राहत होत्या. त्यांचे पती, तीन मुली सासू सासरे असा त्यांचा परिवार होता. विद्या या साकीनाका परिसरात एका खाजगी कंपनीत कामाला होत्या. शनिवारी त्यांनी ठाणे येथून डोंबिवलीला घरी येण्यास गाडी पकडली. कळवा रेल्वे स्थानकात त्यांचा मोबाईल चोरट्याने हिसकावला. त्याचा पाठलाग करताना विद्या यांचा गाडी खाली सापडून मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांचा त्या आधार होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी त्या नोकरीत करुन संसाराला हातभार लावत होत्या. त्यांना आर्थिक मदत दिली गेली पाहिजे. रेल्वेने त्यांना आर्थिक मदत द्यावी," अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.
त्याचबरोबर विद्या यांचा मोबाईल हिसकावून त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या चोरटय़ाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र हा आरोपी या पूर्वीही याच प्रकारच्या गुन्ह्यात पकडला गेला होता. तो सूटन आल्यावर लॉकडाऊनच्या काळात रेल्वे फटालावर पोहचला कसा हा संशोधनाचा विषय आहे याकडे पाटील यांनी लक्ष वेधले आहे.