डोंबिवली MIDC भागात नवीन काँक्रिट रस्त्यावर साचू लागले आहे पावसाळी पाणी

By अनिकेत घमंडी | Published: June 14, 2024 01:10 PM2024-06-14T13:10:58+5:302024-06-14T13:12:12+5:30

मिलापनगर रहिवासी संघाचे पदाधिकारी राजू नलावडे यांनी व्यक्त केली चिंता

Rain water logging started on new concrete road in Dombivli MIDC area | डोंबिवली MIDC भागात नवीन काँक्रिट रस्त्यावर साचू लागले आहे पावसाळी पाणी

डोंबिवली MIDC भागात नवीन काँक्रिट रस्त्यावर साचू लागले आहे पावसाळी पाणी

अनिकेत घमंडी, डोंबिवली: MIDC निवासी भागात काँक्रिट रस्त्यांची कामे जी पूर्ण झाली आहेत, त्यावर आता काही ठिकाणी पावसाळी पाणी साचून राहत असल्याने त्यात बऱ्याच ठिकाणी काँक्रिट रस्त्यावर भेगा पडल्याने या रस्त्यांचा दर्जा यापुढे कितपत राहणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सदर काँक्रिट रस्त्यावर काही ठिकाणी रस्त्यांची पातळी, स्तर हा बरोबर न ठेवल्याने पावसाळी पाणी साचून राहत आहे असे दिसते आहे. हे पावसाळी पाणी काँक्रिट रस्त्यावर पडलेल्या भेगा मधून आत शिरून हे रस्ते खराब होऊ शकतात अशी शक्यता, चिंता मिलापनगर रहिवासी संघाचे पदाधिकारी राजू नलावडे यांनी व्यक्त केली.

गतवर्षी झालेल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणमुळे जे चिखल, खड्डे यांचा सामना निवासीकरांना दरवर्षी सोसावा लागत होता तो यावर्षी तरी सोसावा लागणार नाही असे सकारात्मक चित्र सध्या तरी आहे. मात्र चुकीच्या नियोजनामुळे काही वर्षातच त्या काँक्रिट रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी अजूनही पावसाळी गटारे बनविली गेली नाहीत. काही ठिकाणी ही गटारे बुजलेली आणि साफसफाई केली नसल्याचे दिसत आहे. त्यात हे रस्ते उंच झाल्याने इमारती आणि दुकानात पावसाळी पाणी येण्याची शक्यता आहे. मोठ्या नाल्यांची साफसफाई ही योग्य तऱ्हेने झाली नाही आहे. या नाल्यांची साफसफाई नावापुरती दिघाऊ केली असल्याने पावसाळी पाणी त्यातून कितपत वाहून जाणार हे पाहावे लागेल. भूमिगत सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर या फुटलेल्या असल्याने त्यातील सांडपाणी पावसाळी गटारात आणि रस्त्यावर वाहत आहे. या सांडपाणी वाहिन्या आता नवीन टाकण्याचे काम संथगतीने चालू आहे. काँक्रिट रस्त्यांचा बाजूला काही ठिकाणी अद्याप पेव्हर ब्लॉक न बसविल्यामुळे तेथे चिखल आणि राडारोडा पसरला आहे. त्यामुळे नागरिकांना तेथून चालण्यास त्रास होत आहे. एकंदर हे काँक्रिट रस्ते काही वर्षातच नादुरूस्त होणार यात शंका नाही. प्रशासनाने सदर काँक्रिट रस्त्यावरील झालेल्या चुका आताच सुधारून त्यात लक्ष घातल्यास या काँक्रिट रस्त्यांचा दर्जा सुधारून भविष्यात हे रस्ते नादुरूस्त होणार नाहीत हे पाहिले पाहिजे असेही ते म्हणाले.

Web Title: Rain water logging started on new concrete road in Dombivli MIDC area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.